आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत शिवसेनेशी रणसंग्रामाचे संकेत; पण मुख्यमंत्र्यांचे मौन, सहकारीही संभ्रमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेकडे बहुमत असलेल्या ठाणे महापाैरपदाच्या निवडणुकीत उमेदवार देऊन भाजपने अाता शिवसेनेशी ‘दाेन हात’ करण्याची तयारी केल्याचे संकेत दिले अाहेत. युतीबाबत शिवसेनेकडून काेणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अाता ठाण्याप्रमाणेच मुंबईतही महापाैरपदासाठी उमेदवार देण्याबाबतच्या पर्यायाची चाचपणी भाजपकडून केली जात असल्याचे वृत्त अाहे. विशेष म्हणजे या सर्व घडामाेडींचे ‘पत्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अापल्या हाती ठेवले अाहेत. दरम्यान, गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा देऊन खळबळ उडवून दिली आहे.
 
दरम्यान, चार दिवसांपूर्वी युतीची भाषा करणारे भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी शुक्रवारी ‘शिवसेनेने युती न केल्यास अामच्याकडे सर्व पर्याय उपलब्ध अाहेत’ असा इशाराही दिला अाहे. बहुमताच्या  जोरावर ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित असतानाही भाजपने उमेदवार दिला आहे. मुंबईतही शिवसेनेचे संख्याबळ सर्वात जास्त आहे. शिवसेनेचे ८४ व त्यांना आतापर्यंत ५ अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने  संख्या ८९ वर पोहचली आहे. 

भाजप मात्र ८२ वर असून त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम  तसेच समाजवादी पार्टी यापैकी एकानेही अद्याप पाठिंबा दिलेला नाही. ३१ नगरसेवक असलेल्या तिसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले असले तरी शिवसेनेबाबत  त्यांची भूमिका गुलदस्त्यातच अाहे. भाजप पक्षश्रेष्ठींकडून शिवसेनेशी जुळवून घ्या, असा सबुरीचा सल्ला दिल्याचे  सांगितले जात असले तरी मुख्यमंत्री फडणवीस मात्र याविषयी उघड बाेलायला तयार नाहीत.
 
विशेष म्हणजे जवळच्या  सहकाऱ्यांशीही ते या विषयावर चर्चा करत नसल्याने भाजपचे मुंबई अध्यक्ष अाशिष शेलार यांच्यासह इतर नेत्यांना फडणवीसांच्या मनात नेमके काय चालले अाहे ते कळत नसल्याचे भाजपच्याच एका नेत्याने सांगितले.  मुंबईत उमेदवार देऊन सेनेबरोबर दोन हात करायचा निर्णय भाजपने घेतल्यास त्याचे मोठे परिणाम राज्याच्या राजकारणावर होऊ शकतात, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. 

भाजपने उमेदवार दिलाचतर असा हाेईल तोटा
- मुंबईत शिवसेनेशी पंगा घेतल्यास भाजपला राज्यातील ९ जिल्हा परिषदांवर पाणी साेडावे लागेल.
- मुंबईत विरोधकांच्या मदतीने शिवसेना सत्तेवर आल्यास ते फडणवीसांना स्वस्थ बसू  देणार नाहीत.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शिवसेना सरकारला धारेवर धरण्याची संधी साेडणार नाही. विराेधकांच्या अविश्वास प्रस्तावालाही मदत करू शकते.
- भाजप सरकार अस्थिर करावे, असे काँग्रेस व राष्ट्रवादीला वाटत आहे. तसे या पक्षांच्या नेत्यांनी बोलूनही दाखवले आहे. या सर्व शक्यतांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री सध्या सावध पावले टाकत असल्याचे बोलले जाते.  
 
कोण म्हणतो अाम्ही काँग्रेससाेबत जाताेय : संजय राऊत
महापौरपदासाठी शिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. त्यावर ‘कोण म्हणतो काँग्रेसबरोबर चाललो? आजही आमच्या मनात काँग्रेसविषयी चीड आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला. ‘काँग्रेस आमच्याबरोबर येणार असल्याच्या  नुसत्या चर्चेने भाजपचा तिळपापड होत अाहे. मात्र, काश्मीरमध्ये  पाकच्या समर्थक पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची साथ भाजपला कशी चालते?’, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

भाजपची आज बैठक 
मुंबई महापौरपदाबाबत चर्चा करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी अायाेजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीला अाशिष शेलार, विनोद तावडे व चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. केवळ चर्चा झाल्याचे  दाखवले जाईल.

गीता गवळी भाजपच्या तंबूत
अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका व अंडरवर्ल्ड डाॅन अरुण गवळीच्या कन्या गीता गवळी शिवसेनेसाेबत असल्याची चर्चा होती. गुरुवारी त्या ‘माताेश्री’वर हाेत्या. मात्र गवळी यांच्या अटी मान्य करण्यास सेना तयार नव्हती. काही वेळापूर्वी गीता गवळी भाजप कार्यालयात आल्या. त्यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे. भाजपने गीता गवळी यांना स्थायी समितीचे सदस्यपद आणि आरोग्य विभागाचे चेअरमनपद देण्याचे आश्वासन दिले आहे.
 
वॉर्ड 102 मधील अपक्ष नगरसेविका मुमताज रहेबर राजा खान यांनीही भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता भाजपचे संख्याबळ 84 झाले आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...