आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या डोळ्यातील ३३ मिमीची ढलपी काढली, ही शस्त्रक्रिया म्हणजे ‘वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्य’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ठाण्यातील दोन नेत्रतज्ज्ञांनी एका महिलेच्या डोळ्याच्या खोबणीत चार महिन्यांपासून अडकलेली लाकडाची ३३ मिलिमीटर लांब आणि ५ मिमी व्यास या आकाराची ढलपी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरीत्या बाहेर काढली.

डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेचे वर्णन ‘वैद्यकीय क्षेत्रातील आश्चर्य’ असे केले असून, डोळ्यात अडकलेला सर्वांत मोठा बाह्य घटक काढून टाकणारी ही शस्त्रक्रिया आहे, असा दावाही केला आहे. नेत्रतज्ज्ञ डॉ. शशांक रानडे यांनी डॉ. सुनील मोरेकर या सहकाऱ्यासह ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. आता ते गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

डोळ्यावर सूज, पण वेदना नव्हत्या
शस्त्रक्रियेबाबत माहिती देताना डॉ. रानडे म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सय्यदा खातून (५०) रुग्णालयात आल्या. गेल्या चार महिन्यांपासून उजव्या डोळ्यावर सूज येत असून पाणी वाहत अाहे, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र, डोळ्यात वेदना होत नव्हती आणि दृष्टीही ६/६ अशी निर्दोष होती, पण डोळा खालच्या बाजूने बाहेर आला होता. आम्ही सीटी स्कॅन अहवालाचे विश्लेषण केले तसेच केस हिस्ट्री पाहिली. त्या वेळी सय्यदा खातून लाकडी काठ्यांवर पडल्या होत्या आणि ३३ मिलिमीटर लांबीचा लाकडाचा एक तुकडा त्यांच्या डोळ्याच्या खोबणीत घुसला असल्याचे स्पष्ट झाले.’
गिनीज नोंदीसाठी अर्ज करणार
डॉ. रानडे यांनी या विषयावरील संशोधन साहित्याचे संदर्भ तपासून पाहिले. ‘डोळ्याच्या खोबणीत एवढा प्रदीर्घ काळ बाह्य घटक अडकून राहिला असल्याची कागदोपत्री तरी नोंद नाही,’ असा दावा करत गिनीजसाठी अर्ज करणार असल्याचे ते म्हणाले.

तब्बल चार तास चालली शस्त्रक्रिया
चार ऑगस्टला शस्त्रक्रिया पार पडली. ती तब्बल चार तास चालली. बुबुळाच्या मागे ३३ मिमी लांब आणि पाच मिमी व्यासाचा तुकडा पेशींच्या खाली खोलवर अडकला होता. सीटी स्कॅनमध्येही तो दिसला नव्हता. शस्त्रक्रियेनंतर खातून यांचा त्रास आता बराच कमी झाला आहे.