मुंबई - राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीतील छाेटे घटक पक्ष एकापाठोपाठ भाजप व सरकारविराेधात
आपला असंतोष प्रकट करताना दिसत आहेत. त्यातच शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांची भर पडली. अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजन समारंभाच्या वेळी डावलण्यात अाल्याने नाराज असलेल्या मेटेंनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांची ‘माताेश्री’वर जाऊन सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय चर्चेला ऊत अाला अाहे. ही सदिच्छा भेट असल्याचे मेटे सांगत असले तरी भाजपने सन्मानजनक वागणूक दिली नाही तर अागामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेशी हातमिळवणी करू, असा अप्रत्यक्ष इशाराच मेटेंनी भाजपला दिल्याचे मानले जाते.
‘भाजपवर आपण नाराज आहोत म्हणून उद्धव ठाकरे यांना भेटलो असे हाेत नाही. त्यांच्याविराेधातील नाराजी अापण वेळाेवेळी जाहीरपणे बाेलूनही दाखवली अाहे. त्यामुळे ठाकरेंच्या भेटीचा या विषयाशी संबंध नाही. १९९५ मध्ये मराठा महासंघामध्ये होतो, तेव्हा शिवसेना-भाजपशी युती करून आम्ही एकत्रित िनवडणुका लढवल्या होत्या. आजची ‘माताेश्री’वरील भेट केवळ सदिच्छा भेट होती. शिवस्मारक व मराठा अारक्षणाच्या मुद्द्यांवर अामची चर्चा झाली,’ असे मेटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘माताेश्री’वर अनेक नेते भेटीगाठीसाठी येत असतात. या भेटीतही नवीन नव्हते, असे शिवसेना प्रवक्त्या नीलम गाेऱ्हे म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेची साथ साेडल्यानंतर शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना अाणि रिपाइं या पक्षांनी भाजपसाेबत राहणे पसंत केले हाेते. त्याची फलनिष्पत्ती म्हणून नुकतेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर व ‘स्वाभिमानी’चे सदाभाऊ खाेत यांना मंत्रिपदेही देण्यात अाली. ‘लाल दिवा’ डावलल्यामुळे मेटे मात्र नाराज अाहेत. शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची बाेळवण करण्यात अालेली अाहे. मंत्रिपद न मिळाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा इशाराही त्यांनी यापूर्वीच दिलेला अाहे.
भाजपच्या काेट्यातून विधान परिषदेवर गेलेल्या मेटे यांच्या ‘शिवसंग्राम’चा विधानसभेत एक आमदार आहे. त्यांच्या संघटनेची राज्यात ताकद मर्यादित आहे. मात्र फडणवीस सरकार आपल्याला डावलत आहे, असे मेटे यांना वाटते. त्या नाराजीतूनच मेटे यांनी शिवसेनेशी जवळीक साधल्याचे मानले जात आहे.
मनपात अाम्हालाही वाटा द्या : मेटे
शिवसेना-भाजपच्या युतीबाबत मेटे म्हणाले, ‘युतीचा निर्णय त्या दाेन्ही पक्षांनी घ्यायचा आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लढवण्यास मित्रपक्ष इच्छुक आहेत. जेथे मित्रपक्षांची ताकद आहे, तेथे आम्हाला जागा सोडायला हव्यात. भाजपने छोट्या मित्रपक्षांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी,’ असेही मेटे म्हणाले.
भाजपकडून दुर्लक्षित मेटेंचा नवा पक्ष
भाजपने दुर्लक्षित केल्याची सल मनात असलेले अामदार विनायक मेटे येत्या २० जानेवारी राेजी शिवसंग्राम संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर करणार अाहेत. पुण्यातील एेतिहासिक शनिवारवाड्यात त्यांच्या पक्ष स्थापनेची घाेषणा व जाहीर सभा हाेणार अाहे. मराठा समाजातील संघटना असलेल्या संभाजी ब्रिगेडनेही अलीकडेच संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर केले अाहे.