आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळ अधिवेशन : दूध भेसळखोरांना जामीन न मिळण्यासाठी कायद्यात बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील दूध भेसळीने गंभीर स्वरूप धारण केले असून त्याचा लहान मुलांपासून मोठ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशी भेसळ करणाऱ्यांवर विनाजामीन कलम लावून कारवाई करण्यासाठी केंद्रीय कायद्यात बदल करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

दूध भेसळीच्या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर कालिदास कोळंबकर, हसन मुश्रीफ, सुनील प्रभू अादी सदस्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यात विक्री होणाऱ्या दुधापैकी जवळ- जवळ तीस टक्के दुधात युरिया, ग्लुकोज, चरबी, कॉस्टिक सोडा तसेच गोडेतेलापासून पाण्यापर्यंत भेसळ करून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. दूध भेसळीमुळे क्षयरोग होत असून युरियाची भेसळ केल्यानं मूत्रपिंड, यकृत व हृदयावरही परिणाम होत असून कॉस्टिक सोड्यामुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत असल्याचे सदस्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राहुल कुल, सरदार तारासिंग, पराग अळवणी या सदस्यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केले.

या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना बापट म्हणाले, ‘केंद्राच्या अन्नसुरक्षा व मानदे अधिनियमाद्वारे सध्या भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मुंबईतील काही झोपडपट्ट्यांमध्ये दूध भेसळ करणाऱ्यांवर २९ छापे टाकण्यात आले, तसेच १६ जणांना अटक करण्यात आली असून २९ हजार लिटर दूध नष्ट करण्यात आले. मात्र दूध भेसळ करणाऱ्यांसाठी कठोर कायदा नसल्याने असे अाराेपी सुटतात. दूध भेसळ करणाऱ्यांवर भादंवि कलम ३२८ लावण्यास आम्ही सुरुवात केली होती. हे कलम विनाजामीन असल्याने दूध भेसळ करणारांवर कठोर कारवाई होणार होती. परंतु एका याचिकेवर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने आम्हाला भेसळखाेरांविराेधात हे कलम लावण्यास बंदी घातली. त्यामुळे आता आम्ही भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी विना जामीन कलम लावण्याचा कायदाच करावा, अशी विनंती केंद्राकडे केली अाहे. याबाबत विधी आणि न्याय विभागाबरोबर बैठका झाल्या आहेत.’
नागपुरात भेसळ तपासणी लॅब
दुधात भेसळ झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी एक मशीन तयार करण्यात येत असून या मशीनमुळे कोणीही दुधातील भेसळ शोधून काढू शकतो. प्रत्येक दूध उत्पादकांना हे मशीन लावणे सक्तीचे केले जाणार आहे. तसेच नागपूर येथे दूध भेसळ तपासणी लॅब उभारण्यात येत असून त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील दूध भेसळ तपासणी करणे सोपे जाईल असेही बापट यांनी सांगितले.
> २९ ठिकाणी मुंबईत छापे टाकण्यात आले
> १६ जणांना एकाच वेळी अटक केली
बातम्या आणखी आहेत...