आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदाची झूल लवकरात लवकर उतरवा; उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘मी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसताना, निवडणुकीत हरल्याने  मंत्री होण्यास अपात्र असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला मंत्री केले. कदाचित त्यांना वाटले असावे या माणसाने बरेच काम केलेले आहे त्याची बूज राखावी म्हणून मंत्रिपद दिले असावे. पक्षाने मला बरेच काही दिले आहे, मात्र आता मंत्रिपदाची झूल उतरवावी आणि मला उर्वरित आयुष्यात पक्षाचे काम करण्याची संधी द्यावी,’ अशी अपेक्षा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.  

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवारी रात्री गोरेगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिवाकर रावते, डॉ. दीपक सावंत, रवींद्र वायकर, पांडुरंग फुंडकर आदी  उपस्थित होते.   

देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, ‘बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दगडाला शेंदूर फासला तो देव झाला. माझ्यासारख्या साध्या शिवसैनिकाला त्यांनी थेट नेता केले. माझा बेसिक कोटा पूर्ण झाला असून पुढील आयुष्य हे बोनस आहे. शेवटच्या श्वासापर्यंत असेच कार्यरत राहण्याची माझी इच्छा आहे. मला मंत्रिपदाचे फारसे आकर्षण आता राहिले नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी अाता लाल दिवाही काढून टाकला अाहे,’ असेही देसाई विनोदाने म्हणाले.   शिवसेनेने मला खूप काही दिले आता आणखी काही मिळवायचे असे वाटत नाही.  मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना आनंद आला, असेही देसाई म्हणाले.

देसाईंचा वयाचा दाखला तपासावा लागेल : ठाकरे  
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सुभाष देसाई यांच्या कामाचा उत्साह पाहिला की त्यांच्या वयाचा दाखला तपासून पाहावेसे वाटते. ज्यावेळी लोक हिंदुत्वाचे नाव घ्यायला घाबरत होते तेव्हा बाळासाहेबांनी सामना दैनिक काढून हिंदुत्वाचा लढा उभारला. या दैनिकाच्या उभारणीपासून सुभाष देसाई यांचा मोलाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सुभाष देसाई यांचे वय ७५ असले तरी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा असल्याचे सांगत ‘मेक इन महाराष्ट्र’साठी त्यांनी खूप काम केले आणि उद्योजकांसाठी उपक्रम राबवले, असे गाैरवाेद‌्गार काढले.
बातम्या आणखी आहेत...