आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधक अाक्रमक: अामदार प्रशांत परिचारक निलंबित हाेईपर्यंत कामकाज हाेऊ देणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लष्करी जवान आणि त्यांच्या पत्नींसबंधी अाक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनावरून  विधान परिषद सदस्य  दुसऱ्या दिवशीही आक्रमक झाले. परिचारकांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, असा कडक पवित्रा विराेधकांनी घेतला.  याप्रकरणी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक मंगळवारी होणार नसल्याने सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले.
 
विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परिचारक यांच्या  निलंबनाचा स्थगन प्रस्ताव मांडला. परिचारकांच्या घरासमाेर तीन हजार जवान अाणि त्यांचे कुटुंबीय अांदाेलन करत असताना सभागृहाचे कामकाज सुरू राहिल्यास याेग्य संदेश जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करा, जेणेकरून सैनिकांविषयी  कुणी काही बोलण्याची हिंमत करणार नाही, असे सांगत मुंडे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. यास अामदार डाॅ. नीलम गाेऱ्हे, शरद रणपिसे, भाई जगताप यांनी पाठिंबा दिला. “परिचारकांची सभागृहात बसण्याची पात्रता  नाही. त्यांच्याविषयी असंताेष असताना निलंबनाचा प्रस्ताव मांडायचा मुहूर्त बघताय का,’ असा सवाल नारायण राणे यांनी केला.  
 
बैठक व्हायला हवी होती : सभापती  
परिचारक निलंबन विषयात नैतिकता महत्त्वाची असून पक्ष कुठला हा विषय गौण आहे, असे सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक सोमवारीच व्हायला हवी होती. मात्र, ती झाली नाही. निलंबनाबाबत सत्ताधारी पक्षाला विरोध असल्याचे दिसत नाही. त्यामुळे मंगळवारी ही बैठक अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.   
 
महिला अायाेगाकडे मागितली लेखी माफी  
या प्रकरणी परिचारक यांनी राज्य महिला आयोगाकडे लेखी माफी मागितली आहे. ‘मी सैनिकांचा, त्यांच्या पत्नींचा आदर करतो. माझ्याकडून अनवधानाने तसे वक्तव्य निघाले. कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. भविष्यातही असे घडणार नाही, अशी हमी देतो अाणि बिनशर्त माफी मागतो आहे,’ असा माफीनामा त्यांनी दिला अाहे.
 
परिचारक आमचे आमदार नाहीत; चंद्रकांत पाटील यांनी झटकले हात
परिचारक हे आमचे (भाजप) आमदार नाहीत, असे वक्तव्य सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यावर ‘हा आमचा, हा तुमचा असा अभिनिवेश करू नये. सभागृह सदस्याने गुन्हा केलाय, हे अत्यंत पारदर्शक आहे. त्यामुळे कारवाई तत्काळ झाली पाहिजे,’ अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली.  दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले होते की, सभागृहाची भावना तीच सरकारची असेल. याप्रकरणी वैयक्तिक माफीच्या पलीकडे जाऊन स्युमोटो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यामध्ये कोणतेही डावपेच नको. सर्जिकल स्ट्राइक झाला म्हणून आपण जवानांचा अभिमान बाळगतो. तर, दुसरीकडे सदस्य जवानांविषयी अवमानकारक वक्तव्य करतात. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलून संसदीय कामकाज मंत्र्यांनी निलंबनाचा ठराव आणण्याची मागणी अामदार डाॅ. नीलम गाेऱ्हे यांनी केली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...