आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीद्वेष्ट्या कन्नड वेदिकेच्या व्यासपीठावर मनसेला स्थान, शिवसेनेला अद्याप आमंत्रण नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदीच्या अतिक्रमणाविरोधात प्रादेशिक भाषा अस्मितेची मोट बांधण्यासाठी कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिके या वादग्रस्त आणि मराठीद्वेष्ट्या संघटनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकदिवसीय चर्चा शिबिरासाठी आमंत्रित केले आहे. विशेष म्हणजे मनसेने हे आमंत्रण स्वीकारले असून पक्षाचे नवनियुक्त सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे हे या चर्चा शिबिरात सहभागी होणार आहेत.   
 
बंगळुरूमध्ये सध्या मेट्रो स्थानकांच्या हिंदी भाषेतील नामकरणाचा वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक भाषा अस्मितेसाठी प्रसंगी राज्याराज्यांतील आपापसातले टोकाचे मतभेद बाजूला ठेवत हिंदी भाषा अतिक्रमणविरोधी लढा उभारण्यासाठी प्रादेशिक संघटनांची मोट बांधण्याचा कर्नाटक रक्षण वेदिकेचा हेतू आहे. येत्या शनिवारी बंगळुरूत या एकदिवसीय चर्चा परिषदेचे आयोजन करण्यात आले असून देशभरात प्रादेशिक भाषा अस्मिता कडवटपणे जपणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मनसेसह या परिषदेला द्रमुक, अण्णा द्रमुक, तेलगू देसम आणि तृणमूल काँग्रेस या इतर राजकीय पक्षांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.   
 
याबाबत मनसेचे प्रवक्ते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले की, प्रादेशिक भाषांवर हिंदीच्या अतिक्रमणाविरोधात आम्ही कायमच भूमिका घेतली आहे. या परिषदेचा हेतूही प्रादेशिक भाषांवर हिंदीचे अतिक्रमण रोखणे हाच असल्याने त्यात सहभागी होण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. बाकी मराठीच्या मुद्द्यावर त्या संघटनेशी असलेले आमचे मतभेद कायम राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.   
 
शिवसेनेला अद्याप आमंत्रण नाही 
शिवसेनेला या  परिषदेचे अद्याप आमंत्रण नसल्याचे कळते. हिंदुत्व आणि प्रादेशिक भाषा अस्मिता अशा दोन्ही दगडांवर पाय असल्याने शिवसेनेला सहभागी न करून घेण्याकडे आयोजकांचा कल असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारले असता, ‘कन्नड वेदिकेचे आम्हाला तोंडही पाहायचे नाही,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. आम्हाला त्यांच्या व्यासपीठावर जाण्याची अजिबात इच्छा नसून याच कन्नड वेदिकेवाल्यांनी बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा अट्टहास केला होता. तसेच याच संघटनेने सीमा भागातील मराठी बांधवांवर अत्याचार करण्यासाठी पुढाकार घेत सीमा भागातील मराठी महापौरांच्या तोंडाला काळे फासल्याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. त्यामुळे शिवसेनेचा या संघटनेशी राजकीयदृष्ट्या कोणताही संबंध नाही. आमची लढाई सीमा भागातील मराठी बांधवांसाठी आहे आणि यापुढेही ती कायम राहणार असल्याचेही राऊत म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...