मुंबई - मेरिटच्या निकषानुसारच मनसे उमेदवारी देणार असल्याची अट घालून मागील काही वर्षांत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी चक्क लेखी परीक्षा घेऊन नगरसेवक पदासाठी उमेदवार ठरवले. मात्र, अाता विधानसभा-लाेकसभेनंतर पक्षाकडे येणारा कार्यकर्त्यांचा अाेघ कमी झाल्यामुळे अाता लेखी परीक्षा न घेता सर्वच इच्छुकांना पास करण्याचा निर्णय मनसेने घेतला अाहे. दरम्यान, ‘
आपले कार्यकर्ते आता राजकीयदृष्ट्या अनुभवी आणि अधिक परिपक्व झाल्याने या वेळी महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी देताना इच्छुकांची लेखी घेतली जाणार नाही,’ असे कारण या निर्णयासाठी पक्षाकडून दिले जात अाहे.
मोठा गाजावाजा करत सन २०११ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेत पक्षात एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आमदार असोत किंवा खासदार.. यापुढे मनसेत उमेदवारी मिळवायची असेल तर प्रत्येकाला लेखी परीक्षा ही द्यावीच लागणार, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. ज्या कामासाठी मतदार निवडून देणार आहेत त्या कर्तव्याची आपल्याला खरोखरच जाण आहे का, लोकप्रतिनिधींची कर्तव्ये कोणती याबाबत आपल्या उमेदवारांना माहिती असावी हा या निर्णयामागचा हेतू असल्याचेही राज यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या या निर्णयाचे त्या वेळी कौतुकही झाले होते. मात्र, त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा न घेताच तिकिटे देण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीत तर मनसेवर उमेदवार शाेधण्याची वेळ अाली हाेती. आता मुंबईसह इतर महापालिकेच्या उमेदवारांनाही विनापरीक्षा तिकिटे दिली जाणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले आहे. सध्या मुंबई महापालिकेसाठीच्या मनसे उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून प्रभागातील प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या शिफारशींच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी दिली. प्रमुख स्थानिक कार्यकर्त्यांना आपल्या प्रभागातील दोन उमेदवारांची नावे सुचवण्यास सांगितली आहेत. परीक्षा रद्दच्या निर्णयाबद्दल विचारले असता सावंत म्हणाले, ‘२०११ मध्ये आमचा पक्ष अवघा पाच वर्षांचा होता. त्या वेळी कार्यकर्तेही अनुभवी नव्हते. मात्र, आता आमचे कार्यकर्ते अनुभवी आणि परिपक्व झाल्याने परीक्षेची आवश्यकता नाही.’
कार्यकर्त्यांची पत राखण्यासाठी...
पूर्वी मनसेकडून इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जायची. त्यात काही जण उत्तीर्णही व्हायचे, मात्र एक जागेसाठी २५ ते ५० जण स्पर्धेत असले तरी उमेदवारी मात्र एकालाच मिळायची. मात्र, ज्यांना उमेदवारी मिळायची नाही, ते परीक्षेत नापास झाल्याचा समज संबंधित कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा व्हायचा, त्यांच्या नजरेत ताे कार्यकर्ता कुठे तरी कमी पडला, अशी भावना निर्माण व्हायची. कार्यकर्त्यांची पत घसरू नये म्हणून यापुढे परीक्षा न घेण्याचा निर्णय अाम्ही घेतला अाहे.
राज ठाकरे, पक्षप्रमुख, मनसे
पुढील स्लाईडवर वाचा, उमेदवारांची वानवा हे कारण नाही : नितीन सरदेसाई....