आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी, अडवाणी, महाजन यांच्या निवडणूक खर्चात ‘गोलमाल’!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, केंद्रीय मंत्री उमा भारती, मनेका गांधी, राज्यमंत्री जयंत सिन्हा या नेत्यांनी निवडणूक खर्चाबाबत निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या प्रमुख नेत्यांनी निवडणूक लढण्यासाठी भाजपकडून प्राप्त झालेल्या निधीपेक्षा कमी निधी प्राप्त झाल्याचे शपथपत्र आयोगाकडे दिले आहे. त्यामुळे आता पक्षाचे म्हणणे खरे की नेत्यांचे हा प्रश्न उद्भवला आहे. खर्चाबाबत चुकीची वा त्रुटीपूर्ण माहिती दिल्यास निवडच रद्द करण्याचे अधिकार आयोगाला असल्याने आता काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संस्थेने गेल्या वर्षी झालेल्या लाेकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी व विजयी उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाबाबतच्या शपथपत्रांचा सखोल अभ्यास केला अाहे. त्यात उमेदवार व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या खर्चात तफावत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समाेर अाले आहेत. निवडणुका आटोपल्यावर पक्षांना ९० दिवसांत, तर उमेदवारांना ३० दिवसांत आपल्या खर्चाचे निवेदन सादर करणे बंधनकारक असते. राजकीय पक्षांनी उमेदवारांना दिलेल्या ठोक निवडणूक निधीचे विवरण व उमेदवारांना मिळालेला पक्षनिधी यांची माहिती अायाेगाला देणे बंधनकारक असते. त्यानुसार भाजप आणि या पक्षाच्या विजयी उमेदवारांनी सादर केलेल्या माहितीचा अभ्यास करून एडीआरने उमेदवारांच्या व पक्षांच्या निवेदनांवर गंभीर प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहेत.

पक्षाने निधी दिलाच नाही तरी हिशेबात दाखवले लाखाे रु.
भाजपच्या ७० उमेदवारांनी पक्षाने आपल्याला एकूण निवडणूक निधी म्हणून १४ कोटी दिल्याचे सांगितले अाहे. पक्षाने मात्र अापल्या निवेदनात या उमेदवारांना एकही रुपया दिलेला नसल्याचे निवेदन अायाेगाकडे दिले अाहे. त्यामुळे या नेत्यांच्या निवडणूक खर्चाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन (११ लाख), मुरली मनोहर जोशींनी (३८.५० लाख), उमा भारती (४० लाख), मनेका गांधी (२० लाख), जयंत सिन्हा (४५ लाख), हेमा मालिनी (३३ लाख) यांनीही अापल्याला पक्षाकडून निवडणूक निधी मिळाल्याचे नमूद केले अाहे, तर दुसरीकडे पक्षाने मात्र या सर्व नेत्यांना एक रुपयाचाही निधी दिला नसल्याचे अायाेगाला कळवले अाहे. त्यामुळे अाता भाजप किंवा या पक्षातील नेत्यांची चांगलीच पंचाईत हाेणार अाहे.

१८ खासदारांच्या हिशेबात दीड काेटींची तफावत
भाजपने आपल्याला ३२ लाख ५३ हजार ४७४ रुपयांचा पक्षनिधी निवडणुकीसाठी दिल्याचे वाराणसीचे खासदार व पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी निवेदनात म्हटले आहे, तर भाजपने मात्र मोदींना ४० लाख दिल्याचे आयोगाला सांगितले आहे. गांधीनगरचे खासदार अडवाणी यांनी आपल्याला पक्षाने ३३ लाख ८८ हजार रुपये दिल्याचे म्हटले असले तरी पक्षाने त्यांना ४१ लाख दिल्याचे म्हटले आहे. भाजपच्या निवेदनांचा तुलनात्मक अभ्यास केला असता या पक्षाच्या १८ खासदारांनी पक्षाने दिलेल्या निधीपेक्षा कमी निधी मिळाल्याचे अायाेगाकडे सांगितले अाहे. पक्ष व खासदारांच्या निवेदनातील निधीची तफावत १ कोटी ४८ लाख अाहे. मग हा पैसा नेमका कुठे गेला, त्याची माहिती आयोगाकडून का दडवण्यात आली, हे प्रश्नही उपस्थित होत आहेत.