आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक महापौर बंगल्यातच होणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा अंतिम करण्यात आल्याचे समजते. समितीने जागेबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला असून इतर काही जागांसोबत महापौर बंगल्याचेही त्यात नाव आहे. आता अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांचे यथोचित स्मारक व्हावे आणि यासाठी योग्य जागा मिळावी म्हणून सर्वप्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीमध्ये अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांचाही समावेश होता. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार बाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागा देऊन यथोचित स्मारक बनवेल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. ही समिती जागेची निवड करणार होती. स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावे, अशी शिवसैनिकांची इच्छा होती. परंतु ते शक्य नसल्याने महापौर बंगल्यातच स्मारक करावे, असे शिवसेनेने ठरवले होते.
वडाळा, परळच्या जागेचाही विचार
महापौर बंगल्यासोबत परळ येथील हाफकिन संस्थेची जागा उद्धव ठाकरे यांना आवडली होती, परंतु हाफकिनने जागा देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर वडाळा आणि परळ येथील दोन भूखंडांबाबत चर्चा सुरू झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनुसार महापौर बंगल्यातच बाळासाहेबांचे स्मारक बनवण्याचे निश्चित झाले असून ही जागा समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात सुचवली आहे.
मुख्यमंत्रीच घेतील अंतिम निर्णय
‘बाळासाहेबांच्या स्मारकासाठी आम्ही अनेक जागांचा अभ्यास केला. सर्व जागांचा सखोल अभ्यास करून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे काही दिवसांपूर्वी सोपवला आहे. या अनेक जागांमध्येच महापौर बंगल्याचाही समावेश आहे. स्मारकासाठी कोणती जागा द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. त्यामुळे जागेबाबत मी काहीही सांगू शकणार नाही,’ असे मुख्य सचिव क्षत्रिय म्हणाले.