आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईचे भवितव्य 92 लाख मतदारांच्या हाती! (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी मंगळवारी मतदान होत असून ९२ लाख मतदार या ‘मायानगरी’चे भवितव्य ठरवणार आहेत. भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली असून प्रचारसभांमधील  दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची आक्रमक भाषणे पाहता दोघांकडूनही मोठ्या संख्येने मतदान करवून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील.
 
या वेळी कार्यकर्ते आमनेसामने येण्याची  शक्यता  नाकारता येत नाही. हे लक्षात घेता मुंबईतील संवेदनशील मतदारसंघांवर लक्ष ठेवण्यासाठी  प्रसंगी ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येईल, असे मुंबई महापालिका  प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.  
  
मुंबईत १७ अतिसंवेदनशील, तर ६८८ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांतील प्रचाराचा उडालेला मोठा धुरळा पाहता संवेदनशील केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचमुळे अतिसंवेदनशील केंद्रांच्या बाहेर वेबकास्ट कॅमेरा वापरण्यात येईल.    
 
३७ हजार कोटींचे बजेट असलेली मुंबई ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असून सत्ताधारी भाजपने ‘पार्लमेंट ते पालिका’ असा प्रचार करत ही मनपा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अाहे.
 
शिवसेनेवर अापल्याच सरकारवर टीका करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले अाहे. या साऱ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरींमुळे मंगळवारी प्रत्यक्ष मतदानावेळी कितपत प्रभाव पडतो, याविषयी उत्सुकता वाढली आहे. हे सारे लक्षात घेता प्रशासनाच्या मदतीला पाेलिसांनी मोठी कुमक उभी केली आहे. 
 
२२७ जागांसाठी २ हजार २७५ उमेदवार रिंगणात    
- मुंबई महापालिकेसाठी एकूण २ हजार २७५ उमेदवार रिंगणात असून त्यात महिला उमेदवारांचीही संख्या १ हजार ८४ अाहे. एक तृतीयपंथी उमेदवारही नशीब अाजमावत अाहे. या उमेदवारांना तब्बल ९१ लाख ८० हजार ४९१ मतदार मतदान करतील. मतदारांमध्ये  ५० लाख ३० हजार ३६१ पुरुष व ४१ लाख ४९ हजार ७४९ महिलांचा समावेश अाहे. त्याचबरोबर ३८१ तृतीयपंथीही मतदानाचा हक्क बजावतील.  
 
- १६४ क्रमांकाच्या  प्रभागात सर्वाधिक ३१ उमेदवार उभे असल्याने तेथे तीन मतदान यंत्रे  ठेवण्यात येतील. याशिवाय  ३७ ठिकाणी १५ पेक्षा अधिक उमेदवार असल्याने दोन मतदान यंत्रे देण्यात येणार आहेत. तर निवडणूक साहित्य वाहून नेण्यासाठी ३६०० वाहने दिमतीला असतील.
- मुंबईतील  प्रत्येक प्रभागात ४० हजार ४४२ मतदारसंख्या असून एकूण १ हजार ५८२ ठिकाणी ७ हजार ३०४ मतदान केंद्रे आणि ८२७ ठिकाणी तंबू मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली आहे.  
 
- मतदान प्रक्रियेसाठी ४२ हजार ७९७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ५ कर्मचारी उपलब्ध असतील.  याव्यतिरिक्त ४ हजार ८०९ राखीव कर्मचारीही  नियुक्त करण्यात आले असून यात पालिकेच्या २३ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकार, बेस्ट, शाळा, कॉलेज, शिक्षक, म्हाडाचे कर्मचारीही सोबतीला असतील. 
  
- मुंबईतील निवडणुकीसाठी अंदाजे ९४ कोटी ९० लाख ५० हजार खर्च अपेक्षित अाहे.  
बातम्या आणखी आहेत...