आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसह राज्यातील दहा महापालिका, 11 जिल्हा परिषदांसाठी अाज मतदान, मतदार ठरवणार ‘लायकी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई  - प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांची औकात काढण्यापर्यंत राजकीय नेत्यांची मजल गेल्याचे पाहिल्यानंतर राज्यातील सुमाारे पावणेचार कोटी मतदार मंगळवारी या नेत्यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांची ‘खरी लायकी’ ठरवणार आहेत.  मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषदा, ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी मतदान होणार अाहे.

राज्याच्या राजकीय इतिहासात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार पहिल्यांदाच वैयक्तिक उणीदुणी व टीकाटिप्पणी करण्यावर गेला. युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेची औकात दाखवू, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदार तुमची लायकी दाखवून देतील, असा टोला फडणवीसांना हाणला होता. 
 
 मुंबई महापालिकेची निवडणूक फडणवीस सरकारच्या भवितव्याशी जोडली जात असल्याने राज्याच्या एकूणच राजकाणाच्या दृष्टीने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडणार असल्याची जोरदार हवा प्रचार काळात केलेली असतानाच ही निवडणूक राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण करू शकते, अशी भविष्यवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही करून टाकली आहे.
 
 मुंबईसह  ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे,पिंपरी-चिचवड,सोलापूर,अकोला,अमरावती,नागपूर या महापालिकांसाठीही मंगळवारी मतदान होत असून नाशिक महापालिकेची निवडणूक मनसे नेते राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे मुंबई आणि नाशिकच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती व गडचिरोली या जिल्हा परिषदांसाठीही मतदान होत आहे.
 
पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी १६ फेब्रुवारी राेजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. अाता मंगळवारी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (ता. २३) दाेन्ही टप्प्यांतील निवडणुकीची मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेणार अाहे.
 गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची दोन टप्प्यांत विभागणी करण्यात आली होती. या जिल्ह्यातील ८ पंचायत समित्या व त्यातील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले; तर ४ पंचायत समित्या व त्यातील गटांसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. वर्धा जिल्हा परिषदेच्या २ आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ६ जागांबरोबरच त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या १६ जागांसाठीदेखील मंगळवारी मतदान होत आहे.
 
निवडणूक यंत्रणा सज्ज  मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व एक लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था केली अाहे. २ लाख ७३ हजार ८५९ कर्मचाऱ्यांसह माेठा पाेलिस फाैजफाटाही तैनात केला अाहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

पुढील स्लाईडवर वाचा- मुख्यमंत्र्यांविरुद्ध शिवसेनेची आचारसंहिता भंगाची तक्रार...
 
बातम्या आणखी आहेत...