आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील युतीनंतरच जिल्हा परिषदेचा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांकडून जाणून घेतली राज्यातील परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपला १० पैकी ८ महापालिकांमध्ये  यश मिळाले असले तरी मुंबई व ठाण्यात त्यांना सत्ता मिळालेली नाही. ठाण्यात शिवसेना बहुमताच्या जोरावर महापौर बसवणार हे निश्चित झाले असताना मुंबईत मात्र सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
 
३८ हजार कोटींचे बजेट असलेल्या  देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी एकेकाळच्या  मित्रपक्षांमध्ये डावपेचांचा खेळ सध्या सुरू आहे. मात्र, याच महापालिकेतील शिवसेनेच्या युतीवरच भाजपच्या जिल्हा परिषदांमधील सत्तेचे गणित अवलंबून आहे.  
 
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवार रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या  वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत सर्व मंत्री, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उल्हासनगर महापालिकेत साई पक्षांबरोबर अाघाडी करून महापौर बसवण्याचा  निर्णय घेण्यात आला. मात्र, शिवसेनेसोबत महापालिका तसेच जिल्हा परिषदांमधील युतीवषयी कोणताही निर्णय झाला नाही. फक्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. 
   
मुंबई  व ठाणे वगळता उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूरमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. यामुळे या ठिकाणी त्यांना अापला महापौर बसवण्यासाठी काहीच अडचण येणार नाही; पण २५ जिल्हा परिषदांपैकी फक्त जळगाव, चंद्रपूर, वर्धा, लातूर, गडचिरोली व पाच जिल्हा परिषदांमध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे, तर शिवसेनेला फक्त रत्नागिरीत बहुमत मिळाले आहे. पण भाजपने शिवसेनेला बरोबर घेण्याचा निर्णय घेतला, तर २५ पैकी १२ ठिकाणी युतीची सत्ता येऊ शकते.    
 
अडीच वर्षांचा प्रस्ताव  
मुख्यमंत्री सध्या शिवसेनेच्या भूमिकेचा अंदाज घेत आहेत. युतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रस्ताव यावा, अशी अपेक्षा ते करत असून त्यानंतर अडीच वर्षे महापौर व स्थायी समितीचे अध्यक्षपद असा प्रस्ताव ते सेनेला देतील. याचबरोबर  पारदर्शक कारभारासाठी कंत्राटे देण्याचे निर्णय महापालिकेतच घेण्याची अट घालण्यात येईल. 

मात्र, यासाठी उद्धव तयार होतील की नाही, याविषयी  आताच काही सांगता येत नाही. ९ मार्चला महापौरांची निवड होणार असून ताेपर्यंत दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी भाजप तसेच शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला असता दोघांकडूनही वेट अँड वाॅचची भूमिका घेण्यात आली.
 
मुख्यमंत्र्यांची चर्चा, निर्णय मात्र नाही  
मुंबई महापालिकेत एकत्र आल्यास  नाशिक, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, हिंगोली या जिल्हा परिषदांमध्ये युतीची सत्ता येऊ शकते. एक नंबरचा पक्ष ठरल्याने नाशिक, बुलडाणा, औरंगाबाद, जालना येथे भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो, तर यवतमाळ, हिंगोलीत शिवसेनेच्या अध्यक्षाची शक्यता आहे.
 
आता या सहा जिल्हा परिषदांचे लक्ष मुंबईवर लागलेले आहे. फडणवीस यांनी या भागातील मंत्री तसेच पालकमंत्री यांच्याशी  चर्चा करून सत्तेच्या गणिताची चाचपणी केली. मात्र, निर्णय काही घेतला नाही.
 
बातम्या आणखी आहेत...