आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 11 लाख नावे गायब, मतदार संतापले, प्रशासनाचे मात्र हात वर, राजकीय पक्षांचे नेतेही अनभिज्ञ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  -मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदार माेठ्या संख्येने घराबाहेर पडले खरे, परंतु यापैकी अनेकांची नावेच यादीत नसल्याचे समाेर अाल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सन २०१२ च्या निवडणुकीत असलेली तब्बल ११ लाख नावे या वर्षीच्या मतदार यादीमधून  गायब झालेली दिसली. दाेन ठिकाणी नावनाेंदणी असलेल्या मतदारांची नावे निवडणूक अायाेगाने वगळल्यामुळे हा प्रकार झाल्याचे चाैकशीअंती समाेर अाले. मात्र, मतदान करायला न मिळाल्यामुळे काही मतदारांनी संताप व्यक्त केला.  
 
कफ परेड, वरळी, सायन, मालाड, घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द, बोरीवली, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. विशेष म्हणजे या वेळी मतदान यादीमधून  नावे गायब असलेल्या अनेक मतदारांसाठी विधानसभा निवडणुकीला मतदान केले होते; पण आता नावे यादीत नसल्याने त्यांना धक्का बसला.
 
यापैकी बहुतांश लोक तास, दीड तास रांगा लावून मतदान केंद्रांवर उभे होते; पण मतदानासाठी त्यांचा नंबर येताच त्यांची नावे नसल्याचे सांगितल्याने त्यांची मोठी निराशा झाली. यापैकी काहींनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी  हुज्जतही घातली. पण ‘तुमची नावे नसल्याने आम्ही काही करू शकत नाही,’ अशी उत्तरे त्यांना मिळाली. 
    
मानखुर्दमध्ये मतदार, उमेदवार आणि कर्मचाऱ्यांची  बाचाबाची  झाली. त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आले होते.  यामुळे तणावही निर्माण झाल्याने पोलिस सहआयुक्त देवेन भारती स्वतः जास्तीची पोलिस कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. या घोळानंतर निवडणूक आयोगाला याबद्दल कळवण्यात आले.  
  
विक्रोळी कन्नमवारनगर ही म्हाडाची वसाहत असून येथे नेहमीच मोठ्या संख्येने मतदान होत असते, पण या वसाहतीमधील संपूर्ण इमारतीमधील मतदारांची नावेच यादीमधून गायब झालेली दिसली. सायनच्या प्रतीक्षानगरमध्येही असाच प्रकार घडला असून याविषयी महिला मतदारांनी मोठी नाराजी व्यक्त केली. वाॅर्ड बदल, बदललेली मतदान केंद्रे, वेबसाइटवर नावे असूनही मतदारयाद्यांमध्ये नावांचा समावेश नसल्याने मतदारांना मतदान करता न आल्याचे सांगण्यात आले.  
 
तब्बल ११ लाख नावे मतदार यादीत नसल्याने शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. त्याच्या दक्षिण मंुबई मतदारसंघातील अनेक भागांत लोकांना मतदानापासून दूर राहावे लागले. ‘इतक्या मोठ्या प्रमाणावर नावे मतदार यादीत नसतील तर संशय निर्माण होतो. हे कोणी केले असेल हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही,’ असा अाराेप त्यांनी सत्ताधारी भाजपने नाव न घेता केला.
  
मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे मतदान यादीत असलेलं नाव शोधून देण्यासाठी राजकीय पक्षांचे लोक किंवा सामाजिक कार्यकर्ते बसलेले असतात. आज मात्र त्यांच्याकडे असलेल्या याद्यांमध्ये आणि मतदान केंद्रांत बसलेल्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या मास्टर यादीमध्ये तफावत आढळत होती. अनेक मतदारांना त्यांचं नाव केंद्राबाहेर असलेल्या याद्यांमध्ये दिसत होते. मात्र, मतदान केंद्रात असलेल्या यादीमध्ये मात्र त्या क्रमांकावर त्यांचं नाव नसल्याचे दिसून आले. 
 
दुबार नावे वगळली  
विधानसभा निवडणुकीनंतर मतदार याद्या  नियमित केल्यानंतर ११ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली . विधानसभा निवडणुकीवेळी नावे असल्याने बहुतांशी  लाेक अाता निर्धास्त होते. मात्र, प्रभाग रचनेत वाॅर्ड बदलल्याने  तसेच दोन वाॅर्डांचे एक वाॅर्ड झाल्याने काही नावे उडाली, तर काही जणांची नावे दुसऱ्याच  वाॅर्डमध्ये गेल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने  गेल्या महिन्यात मतदारांची अंतिम यादी तयार केली होती.
 
 मात्र, यात आपली नावे आहेत की नाही, याविषयीची  तपासणी  करण्यासाठी मुंबईकरांना फारसा वेळ मिळाला  नाही. निशेष म्हणजे राजकीय पक्षही निर्धास्त राहिलेले दिसले.  केंद्रीय निवडणूक आयोगाने  दिलेल्या माहितीनुसार ‘यंदा मतदार यादी नव्याने बनवण्यात आली. नवीन सर्व्हे केल्यानंतर वर्षानुवर्षे याद्यांमध्ये आलेली दुबार नावे, मृत  व्यक्तींची नावे या नव्या यादीतून वगळण्यात आली,’ असे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले. 
 
ठाण्यातील याद्यांतही घाेळात घाेळ; सरासरी ५८ टक्के मतदान
मुंबई- ठाणे महापालिकेच्या १३३ प्रभागांसाठी मंगळवारी किरकाेळ प्रकार वगळता माेठ्या उत्साहात व शांततेत मतदान झाले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी ५८ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही मतदारयादीचा घाेळ झाल्यामुळे हजाराे नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले.  
 
शहरात  विविध ठिकाणी मतदान केंद्राबाहेर गर्दी दिसून अाली असली तरी प्रत्यक्ष मतदानासाठी लांबलचक  रांगा असल्याचे चित्र बघायला मिळाले नाही. पण मतदानाच्या टक्केवारीत मात्र सातत्याने वाढ हाेत हाेती. सकाळी साडेअकरापर्यंत १९.३० टक्के असलेले मतदानाचे प्रमाण दुपारी दीड वाजेपर्यंत ३५.११ टक्क्यांपर्यंत गेले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४५.५ टक्क्यांपर्यंत पाेहाेचली हाेती. 
 
मतदानाच्या काही दिवस अगोदर मतदारांच्या घरी विविध राजकीय पक्षांकडून नावांच्या पावत्या येतात, मात्र यंदा अनेक मतदारांना त्या मिळालेल्या नव्हत्या. त्यातच नियमितपणे मतदान करणाऱ्या अनेकांची नावे यादीतून गायब झाल्यामुळे मतदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती.  कोपरी, नौपाडा, वर्तकनगर,वागळे ईस्टेट, घोडबंदररोड, कळवा, मुंब्रा, दिवा भागात शेकडो मतदारांची नावे  यादीतून गायब झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
 
चराई येथे राहणारे मधुकर जोशी यांच्या कुटुंबीयांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आपण मागील चाळीस वर्षांपासून मतदानाचा अधिकार बजावत आहोत. परंतु, याद्यांची तपासणी केली असता माझ्या पत्नीसह दोन मुलांची नावे गायब होती, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आज दाद  मागूनही काय उपयोग होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.   
 
बातम्या आणखी आहेत...