आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल दोन वर्षांचे होईपर्यंत बाळाला मातेचा सहवास देण्याचा मुंबई पोलिस आयुक्तांचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मातृत्व रजेवरून परतलेल्या मुंबई पोलिस दलातील महिलांना त्यांचे मूल दोन वर्षांचे होईपर्यंत कोणतेही दगदगीचे काम न देण्याचा निर्णय मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी घेतला आहे. याउलट विशेष शाखा  किंवा  कार्यालयीन कामे अशी तुलनेने कमी दगदगीची कामे या नवमातांना देण्यात येणार आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांच्या या निर्णयामुळे महिला पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.   


अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा अतिरिक्त ताण, नियमित सुट्यांचा अभाव व कामांच्या अनिश्चित वेळांमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. महिला पोलिस कर्मचाऱ्यांना तर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व कार्यालयीन कामाचा समन्वय साधताना मोठी कसरत करावी लागते. कार्यालयीन जबाबदारीसोबतच मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे त्यांच्यासाठी अवघड असते. केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे सध्या महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची मातृत्व रजा मंजूर मिळते. रजेचा कालावधी जरी मोठा असला तरीही, नवजात शिशूचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी त्याला मातेचा अधिकाधिक सहवास लागतो. मूल दोन वर्षांचे झाल्यानंतर संबंधित महिला पोलिसांना पहिलेसारखे काम करावे  लागणार आहे.

 

महिलांच्या विनंतीवर आयुक्तांचा  निर्णय  
मातृत्व रजा संपल्यानंतर आपणास कमी दगदग असलेल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या देण्यात याव्यात यासाठीचे अनेक विनंती अर्ज महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात येत असतात. ही बाब लक्षात घेत मुंबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी नुकतीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मुंबई पोलिस दलात काम करणाऱ्या अशा नवमातांना त्यांचे मूल दोन वर्षांचे होईपर्यंत विशेष दगदग नसलेल्या किंवा कार्यालयीन जबाबदाऱ्या देण्यात याव्यात, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...