आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीआय कार्यकर्ता वीरा यांच्यावर अमजदनेच झाडली गोळी, आरोपीची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येच्या चौथ्या दिवशी अखेर या हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. वीरा यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला माजी नगरसेवक रझ्झाक खान याचा मुलगा अमजद खान याने आपणच वीरा यांच्यावर गोळी झाडल्याची कबुली दिली आहे.

वीरा यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी वाकोला पोलिसांनी रझ्झाक खान आणि त्याचा मुलगा अमजद खान यांना अटक केली होती. गुन्हे शाखेच्या चौकशीदरम्यान अमजद खान याने हत्येची कबुली दिली असून हत्येसाठी वापरलेले पिस्तूल आणि पाच गोळ्या खान याच्या वाकोला येथील घरातून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खान पितापुत्र हेच या हत्येमागे असून त्यांनी भाडोत्री गुंडाकरवी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय होता. मात्र, अमजदच्या कबुलीमुळे हत्या प्रकरणाची उकल झाली आहे.
कालिना आणि वाकोला परिसरात रझ्झाक खान याने उभारलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात वीरा यांनी माहितीच्या अधिकाराद्वारे लढा पुकारला होता. त्यामुळे बेकायदेशीर बांधकामाच्या विविध प्रकरणांत गेल्या सहा महिन्यांत महापालिकेने अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याबाबत खानला अनेक नोटिसा बजावल्या होत्या. याशिवाय खान आणि त्याच्या कुटंुबीयांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहितीही वीरा यांनी माहिती अधिकाराद्वारे प्राप्त केली होती. बेकायदेशीर पद्धतीने जमिनी बळकावणे, धमकावणे, यासारख्या नऊ गुन्ह्यांमध्ये खान व त्याच्या दोन्ही मुलांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद करण्यात आल्याचे माहितीद्वारे उघड झाले होते. त्यामुळे संतापलेल्या खान पितापुत्राने वीरा यांना कायमचा धडा शिकवण्याचे ठरवले होते.

बंदुकीला होते सायलेन्सर
हत्येच्या दिवशी अमजदने वीरा हे घरी आहेत की नाही हे पाहण्यासाठी आपल्या मित्राला त्यांच्या घरी पाठवले होते. मित्राने वीरा हे घरात टीव्ही बघत असल्याची माहिती दिल्यानंतर अमजदने घरात जाऊन वीरा यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. बंदुकीला सायलेन्सर लावल्याने गोळ्यांचा आवाज आला नव्हता. यानंतर तो लगेच घटनास्थळावरून फरार झाला होता.
बातम्या आणखी आहेत...