आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नटसम्राट\'मध्ये जुगलबंदीची मेजवानी, नाना, विक्रम गोखलेंची नवी दृश्ये समाविष्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाना पाटेकर यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘नटसम्राट’ चित्रपटाने केवळ महाराष्ट्र नव्हे, तर गुजरात, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांतील मराठी-अमराठी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नाना व विक्रम गोखले यांची जुगलबंदी असलेली काही दृश्ये चित्रपटात समाविष्ट केली आहेत.
मांजरेकर म्हणाले की, नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्यातील जुगलबंदी दृश्यांना प्रेक्षकांकडून कमालीचा प्रतिसाद मिळत आहे. या दोघांवर चित्रित बरीच दृश्ये चित्रपटाची लांबी वाढेल या भीतीने आम्ही वगळली होती; परंतु आता चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाने या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची पर्वणी रसिकांना देण्याचे आम्ही ठरवले आहे.
पायरसीमुळे चित्रपटाच्या उत्पन्नावर परिणाम होतोच; परंतु या नवीन दृश्यांमुळे चित्रपट रसिक पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे वळतील, अशी खात्री आहे. तसेच नटसम्राट चित्रपटातील अभिनय आणि मूळ कथा इतकी सुंदर आहे की प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाऊनच चित्रपट पाहतात, अशी माहिती आहे.
तीन आठवड्यांत ३२ कोटींची कमाई : "नटसम्राट' देशभरातील ३७५ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला असून आठवड्याला ८ हजार २५० शो दाखवले जात आहेत. यापूर्वीचा ‘लई भारी’ या चित्रपटाचा सुमारे ४० कोटी उत्पन्नाचा विक्रम नटसम्राट हा चित्रपट हमखास मागे टाकेल, असे वाटते. फक्त तीन आठवड्यांमध्येच या चित्रपटाने ३२ कोटींचा व्यवसाय केला आहे. निर्माते विश्वास जोशी म्हणाले, उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्याचे समाधान या चित्रपटाने आम्हाला दिले. सुदैवाने मराठी चित्रपट रसिकांनी नटसम्राट चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहिला. त्यामुळे पायरसीचा परिणाम तितकासा जाणवला नाही.
नानांकडून उत्पन्नाचा ३० टक्के हिस्सा ‘नाम’ला
नटसम्राट चित्रपटाच्या तीन निर्मात्यांपैकी नाना पाटेकर हे स्वत:देखील एक निर्माते आहेत. या चित्रपटाच्या एकूण उत्पन्नापैकी नाना पाटेकर यांच्या प्रॉडक्शन कंपनीच्या वाट्यातील ३० टक्के उत्पन्न हे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचे नानाने जाहीर केले आहे.