आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी मुंबई मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम , मात्र बहुमतापासून दूरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेली दोन दशके एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री गणेश नाईक यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेची सत्ता जाणार, असे निवडणुकीपूूर्वी वाटत होते. मात्र हा पारंपरिक गड राखण्यात नाईक यशस्वी ठरले. अर्थात स्पष्ट बहुमत नसल्याने राष्ट्रवादीला सत्ताप्राप्तीसाठी काँग्रेसची मदत घ्यावीच लागणार अाहे. दुसरीकडे, भाजपसाेबत केलेली युती शिवसेनेला सत्तेपर्यंत पाेहोचण्यात अडथळा ठरली असाच निष्कर्ष काढला जात अाहे.

लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने यंदा गणेश नाईकांचे महापालिकेतही ‘पानिपत’ हाेणार असा अंदाज लावला जात हाेता. त्यामुळे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये खुशीचे वातावरण होते. पण, औरंगाबादमध्ये युती करणार असाल तर नवी मुंबईतही ती झाली पाहिजे, असा हट्ट भाजपने धरल्यामुळे शिवसेनेला या ठिकाणी मन मारून युती करावी लागली. याचा विपरीत परिणाम हाेऊन शिवसेनेला बंडखाेरीला सामाेरे जावे लागले. १११ पैकी ६७ जागा वाट्याला अालेल्या शिवसेनेेने ३६ जागा जिंकून ५० टक्क्यांपेक्षा जास्त यश मिळवले असले तरी बंडखोरीचा फटका बसल्याने त्यांना १० पेक्षा जास्त जागा गमावाव्या लागल्या. त्याच वेळी फारशी ताकद नसतानाही युतीच्या अाधारावर ४३ जागा लढवण्याची संधी मिळालेल्या भाजपला फक्त ६ जागांवर यश मिळाले. एकूणच नवी मुंबईत भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय शिवसेनेच्या मुळाशी आला.

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ठाणे तसेच नवी मुंबईत गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लागले. त्यांचा मोठा मुलगा संजीव नाईक लोकसभेत पराभूत झाले, तर स्वत: गणेश नाईकांना बेलापूरमध्ये त्यांच्या एकेकाळच्या सहकारी मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेतही नाईकांच्या घराणेशाहीविरोधात मतदान होईल, असे चित्र होते. त्याच वेेळी शिवसेना चांगल्या तयारीत होती. पण, युती झाली अाणि पारडे नाईकांच्या दिशेने सरकले. शिवसेनेला बंडखोरीमुळे हक्कांच्या जागांवर पाणी सोडावे लागले.
ब-याच ठिकाणी शिवसेनेच्या अधिकृत उमदेवारांची ताकद राष्ट्रवादीऐवजी आपल्याच पक्षाच्या बंडखोर उमेदवारां विरोधात दोन हात करताना खर्ची पडली. शिवसेनेतील या बंडखोरीचा फायदा उठवत चाणाक्ष राजकारणी असलेल्या नाईकांनी शिवसेनेच्या बंडखोरांना ताकद पुरवली. त्याच वेळी काही ठिकाणी अपक्षांनाही रसद पुरवण्याचे काम करत निसटत्या विजयात ते आपल्या कामी येतील, याची काळजी घेतली. म्हणूनच अपक्ष म्हणून जिंकून आलेले पाचपैकी चार नगरसेवक नाईकांचे समर्थक मानले जातात. सत्ताप्राप्तीसाठी त्यांचा नाईकांना फायदा हाेऊ शकताे.
मंदा म्हात्रेंच्या हुकूमशाहीने भाजपच्या पदरी अपयश
शिवसेनेसाेबत युती झाल्याने तब्बल ४३ जागा मिळूनही भाजप यश मिळवण्यात साफ अपयशी ठरला. याचे मुख्य कारण म्हणजे मंदा म्हात्रे यांचे नेतृत्व. गणेश नाईकांच्या साथीने राजकारणाचे धडे गिरवणाऱ्या म्हात्रे या नाईकांच्या दादागिरीला कंटाळून भाजपमध्ये गेल्या होत्या. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत त्यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात नाईकांचा पराभव केला होता. मात्र, सहा महिन्यांत हे चित्र बदललेले दिसले. नाईकांप्रमाणेच त्यांनी हुकूमशाही कारभार करायला सुरुवात करताना भाजपऐवजी म्हात्रे म्हणतील तसा कारभार हाकायला सुरुवात केली. भाजपच्या पदाधिकारी वर्षा भाेसले यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यामुळे जशी युती केल्याने शिवसेनेत बंडखोरी झाली तशीच म्हात्रेंमुळे भाजपमध्ये बंडखोरी झाली अाणि त्याचा दोन्ही पक्षांना फटका बसला.
नाईकांची विकासाची भाषा अर्धसत्याची!
गणेश नाईक हे विकासाची भाषा करत असले तरी इतकी वर्षे मनपा तसेच राज्यात सत्ता भोगून त्यांनी फार काही भव्य दिव्य असे काम केले नव्हते. याउलट व्हाइट हाऊससारखा अतिभव्य बंगला उभारणाऱ्या नाईकांवर प्रचंड माया जमा केल्याचाही आरोप होता. राष्ट्रवादीला ‘नेत्यांचा पक्ष’ का म्हणतात हे नाईकांच्या एकाधिकारशाहीतूनही वारंवार दिसून आले होते. यामुळे नाईक जरी आपण विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवल्याने विजयी झालो, असे आता सांगत असले तरी ते अर्धसत्य आहे! भाजपबरोबर शिवसेना फरपटत गेल्याने झालेली बंडखोरी नाईकांच्या पथ्यावर पडली अाणि ते काठावर पास झाले!