आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या कोकणी मतदारांना काँग्रेस खेचणार, नितेश राणेंची रणनीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगली कामगिरी केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या काँग्रेसने आता मुंबईतील कोकणी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. भाजपसमोर हतबल झालेले सध्याचे शिवसेना नेतृत्व पाहता शिवसेनेकडील कोकणी 
मतदार आपल्याकडे आकर्षित करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे काँग्रेसला वाटते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्याबाबतची रणनीती काँग्रेसचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी आखली असून त्याला वरिष्ठांनीही हिरवा कंदील दाखवला आहे.    

काँग्रेसच्या या रणनीतीनुसार मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघातील मूळचे कोकणी असलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणवासीयांचे छोटे मेळावे, सभा आणि बैठकांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी पहिला मेळावा रविवारी मुंबईतील विलेपार्ले परिसरातील दीनानाथ नाट्यगृहात पार पडला. येत्या काळात कोकणातील मतदारांचे प्राबल्य असलेल्या मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील  काही मोजक्या मतदारसंघात या मेळाव्यांचे नियोजन करण्यात येत आहे.  या मेळाव्यांमध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनमानसावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या निवडक लोकप्रतिनिधींना वक्ते म्हणून बोलावण्यात येणार आहे. यामध्ये कोकणातील काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य, त्याचसोबत जिल्हा सहकारी बँकांचे अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश असेल.  
 
काँग्रेसच्या दाव्यानुसार, कोकणात जे मतदार काँग्रेसला मतदान करतात त्याच मतदारांचे मुंबईतील नातेवाईक हे मुंबईत शिवसेनेचे मतदार आहेत. या वर्गाकडे लक्ष केंद्रित केल्यास मुंबईतील अनेक कुटुंबांना काँग्रेसकडे वळवता येऊ शकेल, असा काँग्रेसचा 
अंदाज आहे.   
 
शिवसेनेच्या यशात कोकणींचा हातभार
मुंबईतील कामगार वर्गावर डाव्या चळवळींचा प्रभाव कमी होत असताना कामगार वर्गात प्राबल्य असलेला कोकणी चाकरमानी शिवसेनेकडे आकर्षित झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याने प्रभावित झालेल्या या मुंबईकर चाकरमान्याने मग आपल्याबरोबर शिवसेना कोकणात नेली. विशेष म्हणजे शिवसेनेचे सध्याचे अनेक नेते हे मूळचे कोकणातीलच आहेत. कोकणी माणसाला शिवसेनेकडे आकर्षित करण्यात त्या वेळी शिवसेनेत असलेल्या नारायण राणे, कालिदास कोळंबकर, श्रीकांत सरमळकर यासारख्या 
नेत्यांचा वाटा होता.
 
अस्वस्थतेला वाट करून देणार : राणे  
याबाबत नितेश राणे म्हणाले की, आतापर्यंतच्या शिवसेनेच्या यशात मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणी मतदाराचा मोठा वाटा आहे. मात्र सध्या भाजपसारख्या मित्राकडून शिवसेना नेतृत्वाला मिळत असलेली दुय्यम वागणूक आणि त्याबद्दल शिवसेनेच्या नेतृत्वाची असलेली हतबलता पाहून हा कोकणी मतदार अस्वस्थ आहे. त्यामुळे काेकणी मतदारांमध्ये असलेली शिवसेनेची मक्तेदारी मोडीत काढून त्यांच्या अस्वस्थतेला मोकळी वाट करण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही ते म्हणाले.