आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडेंच्या कार्यालयात तृतीयपंथीयांचे आंदोलन, स्वतंत्र महामंडळाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात शनिवारी तृतीयपंथीयांच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी व तिच्या सहकाऱ्यांनी शनिवारी गोंधळ घातला. तृतीयपंथीयांसाठी महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन देऊनही ते का झाले नाही, याविषयी विचारणा करण्यासाठी लक्ष्मी व तिच्या सहकारी मंत्रालयात आल्या होत्या. मात्र, पंकजा त्यांना न भेटल्याने त्यांचा पारा चढला आणि त्याचा राग त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांवर काढला.  

तृतीयपंथीयांना मानाने जगता यावे यासाठी सरकारने महामंडळ स्थापन करावे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या अनुषंगाने महामंडळाचा प्रस्ताव तयार करण्याचे महिला व बालकल्याणसह सामाजिक विभागाने आश्वासन दिले होते. यासाठी सहा महिन्यांपूर्वी बैठकही झाली होती. पण अजून प्रस्तावच तयार न झाल्याने हे काम पुढे सरकण्याची चिन्हे दिसत नसल्याने लक्ष्मी व तिचे सहकारी संतापले होते. याआधीही त्यांनी संबंधित विभागांकडे विचारणा केली होती. पण काम सुरू असल्याचे आश्वासनच त्यांना सतत मिळत असल्याने त्यांनी थेट मंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतला.
  
मुख्यमंत्री कार्यालयात दिले निवेदन...
मंत्री जागेवर नसल्याने तृतीयपंथीयांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र, आम्हाला तुमचा चहा नको, आधी आमच्या प्रस्तावाचे काय झाले ते सांगा, यावर ते अडून बसले होते. शेवटी पंकजा यांच्याशी त्यांचे बोलणे झाले. तुमच्या प्रस्तावाचे काम हे फक्त माझ्या एकट्याच्या विभागाशी संबंधित नाही. इतरही विभाग यात येत असल्याने या महिन्याच्या अखेरीस संबंधित विभागांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पंकजा यांनी दिल्याचे लक्ष्मी त्रिपाठी यांनी सांगितले. शेवटी पंकजा न भेटल्याने लक्ष्मी व तिच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन निवेदन दिले.
बातम्या आणखी आहेत...