आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निंदाव्यंजक ठरावासाठी विरोधी पक्षांकडून दबाव, आजपासून संसद अधिवेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून बिहार निवडणुकीतील विजयाने बळकटी आलेले विरोधी पक्ष असहिष्णुतेचा मुद्दा उचलून धरणार असून या मुद्द्यांवर निंदाव्यंजक ठरावासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याने हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, अधिवेशन रचनात्मक आणि सार्थक होण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केले आहे.

जीएसटीसारखी महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची असल्याने मोदी सरकारने विरोधकांची मनधरणी करत सहकार्य मागितले आहे. दादरी हत्याकांड आणि कन्नड लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसारख्या अनपेक्षित घटनांबद्दल विरोधकांना असलेल्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे. आम्ही अशा घटनांचे समर्थन करत नाही आणि कोणाला पाठीशीही घालणार, असे सरकारने म्हटले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारचा नरमाईचा सूर दिसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काहीवेळ या बैठकीला हजेरी लावली. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन सार्थक आणि रचनात्मक पद्धतीने चालावे. काही चिंतेचे मुद्दे असतील तर अर्थमंत्री अरूण जेटली चर्चा करतील, असे आश्वासन मोदींनी विरोधकांना दिले.

अभिनेता आमिर खानने केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष असहिष्णुतेच्या मुद्यावर जोरदार मोर्चेबांधणी करत असल्याचे चित्र सरकराने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत दिसून आले. असहिष्णुतेच्या मुद्यावर लवकर चर्चा घ्यावी आणि लेखक, साहित्यिक व चित्रपट कलावंतांच्या पुरस्कार वापसीचा मुद्दा सरकारने सहज घेऊ नये यासाठीही ते आग्रही दिसले.
देशामध्ये जे काही घडत आहे, ते विषन्न करणारे आहे. तरीही पंतप्रधान मौन आहेत. आम्ही हा मुद्दा अधिवेशनात जोरकसपणे लावून धरू, असे काॅंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बंगळुरूमध्ये सांगितले.

कथित असहिष्णुतेचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारितील असला तरी या मुद्यासह सर्व मुद्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. आम्ही अशा घटनांचे समर्थनही करत नाही आणि दुर्लक्षही करत नाही, असे सांसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले.
ठराव झालाच पाहिजे
असहिष्णुतेची निंदा करणारा ठराव संसदेत मंजूर झालाच पाहिजे. संपूर्ण समाज त्यामुळे अस्वस्थ झाला आहे. आमिर खानने जे काही म्हटले आहे ते योग्यच आहे. सत्ताधारी पक्षाने सहिष्णू होऊन हे आवाज नीट ऐकून घ्यावेत, असे जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे.
- राज्यसभेत असहिष्णुतेच्या घटनांचा निषेध करणाऱ्या एक ओळीच्या ठरावाची नोटीस दिली असून अशा घटना घडणार नाहीत याची सरकारने दक्षता घ्यावी, अशी मागणी केली आहे.
- सीताराम येचुरी, माकप नेते