मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ अाणि औरंगाबादेतील मिलिंद महाविद्यालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर प्रकाश आंबेडकर यांचे नियंत्रण राहील, असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. रामदास अाठवले यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे संस्थेचे सदस्य सचिव डी. जे. गांगुर्डे यांची विश्वस्त म्हणून नियुक्तीच धर्मादाय आयुक्तांनी रद्द केली आहे. मात्र, त्याच वेळेस आठवले गटाचेच लेखक गंगाधर पानतावणे यांचे विश्वस्तपद मात्र कायम ठेवण्यात आले आहे. विद्यमान ३ विश्वस्तांपैकी दोन विश्वस्त हे आंबेडकर गटाचे असल्याने आता पीपल्सवर त्यांचाच वरचष्मा राहील, हेही जवळपास निश्चित आहे.
आंबेडकर आणि आठवले गटांमध्ये पीपल्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. या संस्थेत सध्या ४ विश्वस्त असून त्यापैकी डॉ. एस. एस. गायकवाड आणि एम. एस. मोरे हे आंबेडकर गटाचे दोन, तर गंगाधर पानतावणे अाणि गांगुर्डे हे आठवले गटाचे दोन असे एकूण चार विश्वस्त आहेत. गांगुर्डे यांना सदस्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली असल्याने ते या संस्थेचे सर्वेसर्वा बनले होते आणि त्यांनी पदाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत.