आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपेक्षित घटकांसाठी विशेष लक्ष, शिक्षण पद्धतीत बदलासाठी प्रयत्न- रामनाथ कोविंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोविंद यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. - Divya Marathi
कोविंद यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंबई - राष्ट्रपतिपदी निवड झाल्यास आपण समाजातील उपेक्षित घटकांकडे विशेष लक्ष देणार आहोत. याचबरोबर शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील राहू. तसेच देशातील युवकांसाठी मला काम करायचे असून बलशाली भारत घडवायचा आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.   
 
भाजप-शिवसेना आणि घटक पक्षांच्या आमदार, खासदारांशी  चर्चगेट येथील गरवारे क्लब येथे संवाद साधताना कोविंद यांनी हा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी आमदार, खासदार यांना मार्गदर्शन केले.    
राज्यातील एकूण संख्याबळ पाहता भाजप, शिवसेना आणि घटक पक्षांकडे २३९ लोकप्रतिनिधींची मते आहेत. तर, काँग्रेस आघाडी लोकप्रतिनिधींची संख्या फक्त ९८ आहे. यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचे महाराष्ट्रात पारडे जड आहे. सोमवारी होणाऱ्या या निवडणुकीत कोविंद यांना राज्यातून युतीबरोबर इतरही लोकप्रतिनिधींची मते िमळतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.    
या कार्यक्रमाकडे घटक पक्षातील स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पाठ फिरवली. शेट्टी हे पुण्यात एका कार्यक्रमात व्यग्र असल्याचे सांगण्यात आले. तर, रवी राणा यांच्यासह ४ अपक्ष आमदार या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोविंद यांना पाठिंबा दिलेला असल्याने सेनेचे सर्व आमदार आणि खासदार मतदान करून कोविंद यांना राष्ट्रपती भवनात पाठवणार हे निश्चित, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.    
 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कोविंद यांच्या देहबोलीतून दिसून आला. मुंबईवरून ते गोव्याकडे  रवाना झाले असून तेथून ते पुन्हा गुजरातला जातील. एकाच दिवशी तीन राज्यांचा ते धावता दौरा करणार आहेत. शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर मोठ्या जल्लोषात कोविंद यांचे स्वागत करण्यात आले.    
 
 उद्धव यांच्याशी फोनवरून चर्चा   
शिवसेना आपल्या बाजूने भक्कमपणे उभी राहावी यासाठी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार हे प्रथेप्रमाणे “मातोश्री’वर जातात, असा आतापर्यंतचा रिवाज होता. मात्र कोविंद यांनी व्यग्र कार्यक्रमामुळे “मातोश्री’वर जाणे टाळले. यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. पण कोविंद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या चर्चांवर पडदा टाकला.
बातम्या आणखी आहेत...