आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिदिनी हाक ‘नामदेवा, कधी रे उमजशील’, चित्रे, गाण्यांतून ढसाळांना अादरांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भल्या सकाळी शिवाजी पार्कवर कवींची गर्दी होती. काही जण नामदेवांच्या आठवणी सांगतंय, कोणी त्यांची आवडलेली कविता म्हणतंय, काही चित्रकार कुंचल्यातून नामदेव उलगडताहेत.. बाजूलाच कामाठीपुऱ्यातल्या वेशावस्तीचं जळजळीत दर्शन घडवणाऱ्या छायाचित्रांचंं प्रदर्शन आहे. व्यासपीठावरच्या राॅक बँडवर ढसाळांची गाणी वाजतायंत, असा हा समग्र ढसाळपुरा शुक्रवारी मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या प्रांगणात अवतरला होता. निमित्त होतं दलित पँथरचे संस्थापक, बंडखोर कवी नामदेव ढसाळ यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाचं..!

ढसाळ जाऊन आज दोन वर्षे लोटली. ढसाळ यांच्या फॅन्सनी गतवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या स्मृतिदिनाच्या आठवणी जागवल्या. त्यासाठी पुढाकार घेतला होता. फेसबुक आंबेडकराइट मूव्हमेंट म्हणजे ‘फॅम’ने. कार्यक्रमाचं नाव होतं ‘सारं काही समष्टीसाठी.’ यामध्ये नामदेवांचा पट्टशिष्य वैभव छाया अग्रभागी होता.

सकाळी सकाळी सुधाकर ओलवे यांच्या छायाचित्र प्रदर्शनानं कार्यक्रमाला तोंड फोडलं. ढसाळांनी कवितेतून मुंबईची वेशावस्ती म्हणजे कामाठीपुऱ्याचं दु:ख मांडलं. ओलावे यांची छायाचित्रं पाहून ढसाळांची ही अनघड कविता उलगडायला मदत होत हाेती. त्याच्या बाजूला काही युवा चित्रकार ढसाळांच्या कविता आपल्या कुंचल्यातून व्यक्त करत होते. वैभव मोरे या युवा कवीनं दादांच्या (नामदेव) काही कवितांचं सादरीकरण केलं, तर वैभव छाया याने घरावर प्लॅस्टिक कागद टाकण्यासाठी नामदेवने कवितांची वही कशी विकली याचा किस्सा सांगितला. संगीतकार सतीशचंद्र मोरे यांनी नामदेवची काही गीते सादर केली. ‘हा चंद्र समोर असताना, तो चंद्र कशाला पाहू?’ या नामदेवच्या गीताला मोठीच दाद मिळाली. योगेश पवार यांनी नामदेवच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद सादर केले. सकाळी नऊपासून सुरु झालेल्या नामदेवच्या उरुसाला हजारो कवी-शौकिनांची हजेरी होती. मुंबईतलं सांस्कृतिक विश्व आता थिजलंय, पण नामदेवसाठी आज सगळे आवर्जून हजर होते. सायंकाळी अजय देहाडे याने वामनदादा कर्डकांची गीतं सादर करून जोश आणला. राहुल भंडारे यांनी पथनाट्य सादर केलं, तर कबीर शाक्य यांच्या राॅक बँडने ढसाळांच्या कविता सादर करून ढसाळपुराची लज्जत वाढवली.

यशवंत यांना पुरस्कार
विदर्भातले कवी लोकनाथ यशवंत यांना यंदाचा ढसाळ पुरस्कार ज. वि. पवार यांच्या हस्ते देण्यात आला. २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप अाहे. तर ढसाळ यांच्या पत्नी कवयित्री मल्लिका अमरशेख यांनी ढसाळ यांच्या काही अप्रकाशित कवितांचे वाचन केले.