आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साने गुरुजींच्या विचारांचा आता यूट्यूब चॅनलद्वारे प्रसार, नामवंतांच्या मुलाखतींचे विशेष भाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बालगोपाळांसाठी ‘श्यामची आई’ हे अतिशय हृदयस्पर्शी पुस्तक लिहिणारे लेखक, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशा विविध रूपांनी परिचित असलेले साने गुरुजी यांचे जीवनकार्य नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील वडघर (ता. माणगाव) येथील गुरुजींच्या राष्ट्रीय स्मारकाने यूट्यूबवर नुकतेच चॅनल सुरू केले अाहे.
 
या चॅनलवर साने गुरुजी तसेच त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या कार्याची ओळख करून देणारे अनेक कार्यक्रम काही महिन्यांत प्रक्षेपित करण्यात येतील. स्नेहल एकबोटे, प्रकेत ठाकूर, सतीश शिर्के व स्मारकाचे कार्यकारी अध्यक्ष प्रमोद निगुडकर यांनी या कामी अथक मेहनत घेतली आहे. वडघर येथे १९९९ मध्ये स्थापन झालेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा कार्यविस्तार झाला आहे, त्याचे दर्शन या चॅनलद्वारे सर्वांना घडावे असा उद्देश आहे. हे चॅनल https://www.youtube.com/watch?v=m9j_ZD-dHIg&feature=youtu.be या लिंकवर पाहता येईल.  या चॅनलवर दर पंधरा दिवसांनी विशिष्ट विषयावर एकेक भाग प्रक्षेपित करण्यात येणार आहे. या चॅनलवर १५ मे रोजी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या भागात स्मारकामध्ये राबवण्यात येणारे युवा छावणी, वर्षारंग, अभिव्यक्ती शिबिर अादी कार्यक्रमांची माहिती असेल.  ‘श्यामची आई’ हे पुस्तक साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात लिहिले. त्या पुस्तकाच्या लेखनाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कारागृहातच नुकताच एक कार्यक्रम झाला होता. त्यााचा लघुपटही या चॅनलवर बघायला मिळेल. राष्ट्रीय स्मारकामध्ये अनुवाद सुविधा केंद्र असून ते उभारण्यासाठी विंदा करंदीकर यांनी ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम देणगी म्हणून दिली होती. या अनुवाद केंद्राचे जे कार्य चालते त्यावरही माहिती देणारा एक भाग प्रक्षेपित हाेणार अाहे. 
 
नामवंतांच्या मुलाखतींचे विशेष भाग  
साने गुरुजींच्या कार्याने प्रभावित होऊन ज्या व्यक्तींनी राष्ट्रीय स्मारकात मोठे योगदान दिले अशा व्यक्तींच्या सविस्तर मुलाखती या चॅनलवर दाखवण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रा. पुष्पा भावे, किशोर मेहता अशा दिग्गज व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश असेल. प्रत्येक मुलाखतीचा एक स्वतंत्र भाग असेल. 
बातम्या आणखी आहेत...