सांगली/ काेल्हापूर/ पुणे - जून महिनाभर प्रतीक्षा करायला लावलेल्या वरुणराजाने अखेर जुलैच्या प्रारंभी पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात हजेरी लावली अाहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना, वारणा, राधानगरी धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोयना धरणाचा पाणीसाठा गेल्या चार दिवसांत टीएमसीने वाढला आहे. साेलापुरात मात्र रविवारी पावसाने पाठ फिरवली हाेती.
जून महिन्यात तीन आठवडे दडी मारलेल्या मान्सूनच्या पावसाने गेल्या तीन- चार दिवसांपासून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत चांगली हजेरी लावली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कोयना आणि वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी सकाळी वाजेपर्यंत कोयना धरणात १५.८६ टीएमसी पाणीसाठा होता. चार दिवसांत तो तीन टीएमसी इतका वाढला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे १६४ मिमी तर नवजा येथे १९६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सांगली जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत सरासरी १६ मिमी नाेंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३४ मिमी पडला.
गगनबावड्यात १०९ मिमी : गेले तीन दिवसांपासून काेल्हापूर जिल्ह्यात जोराचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर जिल्ह्यात सरासरी ३९.१० मिमी पाऊस पडला. एक जूनपासून जिल्ह्यात ३५२.७१ मिमी पाऊस झाला.
भुशी डॅम खळाळून वाहू लागला
पुणे शहरात गेल्या ४८ तासांत सुमारे १६० मिमी पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण साखळीतही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाणी येण्यास सुरवात झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. पवना धरणक्षेत्रात दमदार पावसाने इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहात आहे. लोणावळ्यात गेल्या ४८ तासात ३८० मिमी पाऊस कोसळला आहे. पर्यटकांना अाकर्षित करणाऱ्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहात आहे. महाबळेश्वर ते पाेलादपूर रस्त्यावर अांबानळी घाटात दरड काेसळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली हाेती. तर माळशेज घाटातील महादेव मंदिराजवळही दरड काेसळल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. सुदैवाने यात काेणतीही हानी झाली नाही.
नाशकात मुसळधार, दारणा नदीला पूर
प्रतिनिधी । नाशिक/ इगतपुरी
महिनाभरापासून चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या पावसाने रविवारच्या सुटीचा ‘मुहूर्त’ साधत नाशकात दमदार हजेरी लावली. दिवसभर मुसळधार ते मध्यम स्वरुपात बरसणाऱ्या पावसामुळे शहरवासीय अानंदाने चिंब भिजून गेले. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी- नाले अाेसंडून वाहू लागले अाहेत. पहाटे तीन वाजेपासून दमदार एन्ट्री केलेल्या पावसाची रविवारी दिवसभरात नाशिक शहरात ६० मिमी नाेंद झाली. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या पाणलाेट क्षेत्रातही पाऊस पडल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ हाेऊ लागली अाहे. इगतपुरीत रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १४१ मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये ३५ मिमी पाऊस पडला. या इगतपुरी तालुक्यातील दारणा, भाम, वाकी खापरी, कडवा या नद्यांना पूर आला आहे.
धुक्याचे साम्राज्य
सकाळपासून इगतपुरी शहरासह कासार घाटातील महामार्गावर धुक्याने सर्वत्र वेढले होते. जळगाव शहर व परिसरातही रविवारी संततधार व काही ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली.
खान्देशात सहा जणांचा मृत्यू, मायलेकी पुरात वाहून गेल्या
जळगाव |जळगाव व धुळे जिल्ह्यात रविवारी पाऊस व पुरामुळे सहा जणांचा बळी गेला. पारोळा तालुक्यातील लोणसिम येथे पावसामुळे भिंत कोसळून बालक ठार झाला. चोपडा तालुक्यातील लासूर-हातेड रस्त्यावरील डबक्या नाल्याच्या पुरात मायलेकींचा मृत्यू झाला. गोरगावले रस्त्यावरील खदानीच्या पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. धुळ्यात धबधब्याखाली सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू झाला.
चोपडा तालुक्यात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे लासूर-हातेड रस्त्यावरील डबक्या नाल्याला पूर आला. याच वेळी शेतातून घराकडे परतत असताना नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने उषाबाई जगदीश वाघ (वय ४२) आणि त्यांची मुलगी बबली जगदीश वाघ (११) वाहून गेल्या. काही वेळाने त्यांचे मृतदेह दिसून अाले.