आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे युतीसाठी इच्छुक, राज्यभरात ताकद घटल्याने अखेर मनसेला मुंबईपुरता मित्राचा शाेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई  - मुंबईत महापालिका निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून युती-आघाडीच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला तोंड फोडले. ‘युतीबाबत प्रस्ताव आल्यास मुंबई महापालिकेसाठी मी नक्की विचार करीन’, असे विधान राज यांनी मंगळवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केले. मात्र, राज ठाकरे कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत, हे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवले. त्यामुळे आता युती आणि आघाडीच्या जागावाटप बोलण्यांमधे रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.   
पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरे यांचा ‘एकला चालो रे’चा नारा कायम राहिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत युती तुटल्यावर शिवसेना आणि मनसेची प्राथमिक स्तरावर युतीबाबत बोलणी झाली हेाती.  मात्र, अचानक शिवसेनेकडून प्रतिसाद थांबवल्याने ती चर्चा पुढे जाऊ शकली नव्हती. काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची अचानक ‘मातोश्री’ वारी झाली. त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील अद्यापही बाहेर आलेला नाही. अलीकडे राज ठाकरे यांच्या  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘वर्षा’वर  तीन गोपनीय बैठका झाल्या. त्या वेळीही भाजप- मनसे युतीचे भाकीत वर्तवले गेले, मात्र अधिकृत निर्णय अद्याप अालेला नाही.  


भाजप- शिवसेना चार हात दूरच
दरम्यान, २२७ नगरसेवकांच्या मुंबई महापालिकेत मनसेचे २७ नगरसेवक आहेत. त्यातले बरेच नगरसेवक िनवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत स्वगृही परतले आहेत. वाॅर्ड पुनर्रचनेतही अनेक मनसे नगरसेवक अडचणीत आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईसह राज्यात पक्षाची ताकद कमी झाल्यामुळे मनसेला या वेळी कोणी गृहीत धरत नाही आहे. मनसेशी युती करणे भाजपला अडचणीचे आहे. मनसेशी युती केल्यास उत्तर भारतीय मते काँग्रेस किंवा सेनेकडे वळतील, अशी भाजपला चिंता आहे. ‘जागावाटपात शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी भाजपकडून मनसेचा केवळ मोहरा म्हणून वापर होईल,’ असे शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे.