आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षात गटबाजी खपवून घेणार नाही- राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना मनसे अाचारसंहिता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील आढावा बैठकांमध्ये आपल्याला स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून ते अगदी वरिष्ठ स्तरावरील नेत्यांपर्यंत गटबाजी आढळली. त्यामुळे यापुढे पक्षातल्या प्रत्येकाला त्यांनी कोणते काम करावे याची आचारसंहिता असेल, अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साेमवारी केली. मुंबईतील माटुंगा परिसरातील यशवंत नाट्यमंदिरात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. आपल्या भाषणातून त्यांनी मनसेचे काही विशिष्ट नेते आणि कार्यकर्त्यांना सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे.    
 
मुंबईत विभागवार आढावा बैठका घेतल्यानंतर राज ठाकरेंनी मुंबईत स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले. या फेरबदलानंतर नवीन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जेमतेम तासभर चाललेल्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी छोटेखानी भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्य मुद्द्याला हात घालत राज म्हणाले की, ‘यापुढे मनसेत मला गटबाजीचे राजकारण नको आहे.’ मुंबईतील बैठकांमध्ये आपल्याला दुर्दैवाने सर्वत्र गटबाजी आढळल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, ‘यापुढे कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकाऱ्यांसाठी पक्षकार्याची एक विशिष्ट यंत्रणा असेल, एक आचारसंहिता असेल. तुम्हाला मला आता फसवता येणार नाही. संघटनात्मक पातळीवर काम करताना या आचारसंहितेचे पालन सर्वांनाच करावे लागेल.’
 
शिशिर शिंदेंची मेळाव्याला दांडी   
पक्षाच्या आढावा बैठकांमध्ये राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिश: संवाद साधला होता. या बैठकांपासून त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे  साेमवारच्या मेळाव्यात कोणते नेते हजर राहतात, नेत्यांची देहबोली कशी आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. सध्या नेतृत्वावर नाराज असलेल्या शिशिर शिंदेंनी या मेळाव्याला दांडी मारली होती. इतर प्रमुख नेत्यांनी मात्र मेळाव्याला उपस्थिती लावली होती.  
 
बातम्या आणखी आहेत...