आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडव्यासाठी तिळाचे लाडू दिल्लीला नेणार, राहुल गांधींचा गटबाजीवर उतारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काँग्रेस नेत्यांचे आपसातील वाद मिटवण्यासाठी मी आता त्यांना तिळाचे लाडूच देणार असून हे लाडू मी दिल्लीलाही घेऊन जाणार आहे, असे सांगतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी पक्षांतर्गत गटबाजीवर उतारा शोधला. ऐन संक्रांतीच्या दिवशीच मुंबईत आलेल्या राहुल गांधी यांनी "तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' असे मराठीतून आवाहन करतच भाषणाची सुरुवात केली. ही म्हण आपल्याला खूप आवडल्याचे सांगून त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या.

दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असलेले राहुल मालाडच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. केंद्र, राज्य व मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर या वेळी त्यांनी जोरदार टीका केली. भारत हा उद्योगपती व श्रीमंतांचा देश नाही. या देशात गरीब, शेतकरी, मजूर मोठ्या संख्येने असून "स्टार्ट अप' करताना तळागाळातील लोकांना विसरून चालणार नाही. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीत तसे होत नाही, असेही ते म्हणाले.

पठाणकोट हल्ला मोदींचे अपयश
पठाणकोट हल्ल्ला हे मोदी यांचे अपयश आहे. मोदींची कार्यशैली व्यक्तिकेंद्रित आहे. सर्व काही मीच करणार, असा त्यांचा खाक्या आहे. त्यामुळे मोदी सरकारमध्ये कामांचे विकेंद्रीकरण झालेले नाही. त्यामुळेच पठाणकोट हल्ला उधळवून लावण्यात आपल्याला अपयश आले, अशी टीका राहुल गांधी यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेच्या वेळी केली.

तिळगूळ देऊनच टोकाचे वाद मिटवा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमाविरुद्ध गुरुदास कामत, प्रिया दत्त, कृपाशंकर सिह, नसीम खान यांनी आघाडी उघडली असून त्यांना हटवण्याच्या कारवायांमुळे वाद टोकाला गेला आहे. नसीम खान व अस्लम शेर खान या अामदारांत तर हाणामारीही झाली होती. सभेचे निमित्त साधून राहुल यांनी यावर तिळगूळ देत भांडणे मिटवण्याचा सल्ला दिला.

सभा अाटाेपून गेले, पुन्हा येऊन भेटले!
उत्तर मुंबईत याआधी इंदिरा गांधी व राजीव गांधी आले होते. गेली ३० वर्षे गांधी परिवारातील नेता न आल्याने जनतेला राहुल यांना पाहण्याची उत्सुकता होती. सभा आटोपल्यानंतर ते मंचाच्या मागून निघून गेले, पण काही मिनिटांतच ते पुन्हा आले, लोकांना भेटले. त्यांच्याशी हस्तांदोलनही केले.