आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रिव्हेंज पॉर्न’चा धोका वाढताेय; \'त्या\' क्षणांचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ इंटरनेटवर होताहेत व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नातेसंबंधात दुरावा आल्यानंतर पूर्वाश्रमीच्या प्रियकर अथवा प्रेयसीला अद्दल घडवण्यासाठी त्या साथीदारासोबत व्यतीत केलेल्या खासगी क्षणांची आक्षेपार्ह छायाचित्रे किंवा छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रित केलेल्या चित्रफिती समाज माध्यमांवरून प्रसारित करण्याचा ट्रेंड भारतात वाढू लागला आहे. एखाद्याच्या खासगीपणाचा भंग करणाऱ्या या विकृतीला ‘रिव्हेंज पॉर्न’असे संबोधले जाते. सायबर अँड लॉ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने २०१६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे याबाबतचे सायबरविषयक कायदे सक्षम असूनही बदनामीच्या भीतीपोटी ‘रिव्हेंज पॉर्न’ची अनेक प्रकरणे दोषसिद्धीच्या टप्प्यापर्यंत पोहोचतच नाहीत, हे वास्तव आहे.


प्रकरण १
नाशिक : प्रेयसीचा उल्लेख वेश्या करणारा तरुण अटकेत

नाशिक येथील एका महाविद्यालयीन तरुणीच्या शालेय जीवनातील मित्राने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दोघांमधील नातेसंबंध संपुष्टात आल्यानंतर त्याने त्यांच्यातील खासगी क्षणांचे चित्रीकरण तिला वेश्या संबाेधून विविध पॉर्नसाइट्सवरून प्रसारित केले. गुगलवर संबंधित तरुणीच्या नावासह शोध घेतल्यास त्या सहज उपलब्ध होतात. संबंधित तरुणी आणि तिचे कुटुंबीय कमालीच्या तणावाखाली आहेत. याप्रकरणी तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला जामीन नाकारला आहे. अडचणीची बाब म्हणजे जवळपास १२५ पेक्षा अधिक पॉर्नसाइट्सवर या चित्रफिती उपलब्ध असल्याने न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित चित्रफिती सर्वच्या सर्व पॉर्नसाइट्सवरून काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.


प्रकरण २
पुणे : महिलेचा पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडून छळ
पुण्यातील एक विवाहित महिला रुग्णालयात नोकरी करते. दुसऱ्याशी लग्न केल्याच्या रागातून तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराने दोघांमधील खासगी क्षणांचे चित्रीकरण तिच्या रुग्णालयाच्या संकेतस्थळावरच अपलोड केले. या प्रकरणामुळे महिलेचे वैवाहिक आयुष्यच धोक्यात आले आहे. ही दोन्ही प्रकरणे हाताळणारे वकील आणि सायबर कायदेतज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी आरोपींच्या मानसिकतेबाबत सांगितले, ‘रिव्हेंज पॉर्नचा वापर साधारणत: पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करून तिची आणि तिच्या कुटुंबीयांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी किंवा संबंधित व्यक्तीची शारीरिक पिळवणूक करण्यासाठी केला जातो. दर महिन्याला रिव्हंेज पॉर्नची साधारण दोन प्रकरणे आपल्याकडे येत असतात. याबाबत जागृती करण्यासाठी समाज आणि कुटुंब म्हणून आपणच पुढाकार घेण्याची गरज अाहे.

 

अमेरिकेत २५ जणांमागे एक व्यक्ती रिव्हेंज पाॅर्नची बळी
जगभरात जवळपास तीन हजारांपेक्षा अधिक रिव्हेंज पॉर्नसाइट्स असल्याचा अंदाज अाहे. सायबर अँड लॉ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने २०१६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार इंटरनेटचा वापर करणाऱ्या १३ ते ४५ या वयोगटातील जवळपास २७ टक्के नेटिझन्सचा संबंध या ना त्या कारणाने अशा प्रकारच्या रिव्हेंज पॉर्न प्रकरणांशी आला आहे. रिव्हेंज पॉर्नचे प्रमाण अमेरिकेत सर्वाधिक असून एका सर्वेक्षणानुसार २५ ऑनलाइन अमेरिकन्सपैकी किमान एक व्यक्ती आक्षेपार्ह छायाचित्रे किंवा चित्रीकरणाच्या समाज माध्यमांवरील प्रसारणामुळे सार्वजनिक बदनामीची बळी ठरते.

 

पुढील स्लाइडवर वाचा,
> कायदा काय सांगताे.. ७ वर्षांपर्यंत शिक्षा, १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद....

> पीडितांनाे, मदतीसाठी डायल करा ९८२०८१०००७...

>रिव्हेंज पॉर्न रोखण्यासाठी फेसबुक, ट्विटरचा पुढाकार....

बातम्या आणखी आहेत...