आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'समाजशास्त्रा\'तच हुंड्याला चालना, पुस्तकात सांगितले- मुलगी कुरूप असेल तर जास्त हुंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लग्नाच्या वेळी हुंडा का मागितला जातो? याचे कारण सर्वांनाच ज्ञात असले तरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ मात्र या संवेदनशील सामाजिक प्रश्नाबद्दल प्रचंड असंवेदनशील अाहे. मुलीची कुरूपता आणि दिव्यांगत्व हे समाजात हुंडा मागण्याच्या कारणांपैकी एक प्रमुख कारण आहे, अशी शिकवण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांना दिली जात आहे. अशी असंवेदनशीलता दाखवून बोर्डाला सामाजिक कुप्रथा व परंपरांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात नेमकी कोणती भावना निर्माण करायची आहे? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रमाणित केलेल्या इयत्ता १२ वीच्या समाजशास्त्राच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात  ‘भारतातील प्रमुख सामाजिक समस्या’ नावाचे तिसरे प्रकरण आहे. या प्रकरणात धर्म, जातिप्रथा, प्रतिष्ठा आणि भरपाई अशा हुंडा प्रथेच्या अन्य कारणांपैकी मुलीची कुरूपता आणि दिव्यांगत्व हेही एक प्रमुख कारण देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी बोर्डाने हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट केले असून राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा अभ्यास केला आहे. मुलीची ‘कुरूपता आणि दिव्यांगत्व’हे जास्त हुंडा मागितला जाण्याचे कारण सांगणे म्हणजे मुलगी सुंदर असेल तर तिला हुंडा मागितला जात नाही, असा चुकीचा संदेश या प्रकरणातून विद्यार्थ्यांना दिला जात आहे. या संदेशामुळे विद्यार्थिनींच्या मनात न्यूनगंडही वाढीस लागत आहे.
 
हे पाठ्यपुस्तक प्रमाणित करताना बोर्डाने या पॅरेग्राफच्या सामाजिक दुष्परिणामांचा विचार केला नाही का? असा प्रश्न लैंगिक समानतेसाठी काम करणारे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. या विषयावरू वाद होताच  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांना योग्य सूचना दिल्या आहेत, असे शालेय शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

अाक्षेपांवर विचार करू : राजकारण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम असे दोन विषय एकत्रित करू नये. हा अभ्यासक्रमाचा विषय असून अभ्यासक्रम ठरवण्याचे काम अभ्यास मंडळ करते. अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून समाजातील वास्तव  दाखवण्याचा  प्रयत्न अभ्यास मंडळाने केला असावा. तरीही आक्षेप असतील तर त्याचा विचार केला जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले अाहे.

सामाजिक समस्या समजावण्याचा प्रयत्न : केलेला शब्दप्रयोग चुकीचा वाटू शकतो.परंतु जी सामाजिक समस्या आहे,ती समस्या समजावून सांगून त्यावर उपाय शोधण्यााठी हा मुद्द अभ्यासक्रमात आहे. कुणाला दुखावण्याचा त्यात उद्देश नाही, असे शिवछत्रपती महाविद्यालयाच्या प्रा.ए.डी.शेजुळ यांचे म्हणणे अाहे.

मूळ मजकूर असा
‘मुलगी जर कुरूप किंवा दिव्यांग असेल तर तिचे लग्न जमवणे खूपच कठीण असते. अशा मुलींसाठी जास्त हुंडा मागितला जातो. या मुलींचे पालकही असहाय होतात आणि नवरा मुलाच्या कुटुंबाने मागितला तेवढा हुंडा देतात. त्यामुळे समाजात हुंड्याची प्रथा वाढीस लागली आहे.’

न्यूनगंडाला खतपाणी
अशाने विद्यार्थिनींच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. कुणाच्या दिसण्याविषयी उल्लेख आल्यास मानिसक ताणाव निर्माण होऊ शकतो. शिवाय कुटुंबात असे काही घडले तर हुंडापद्धतीकडे लोक वळतात. पैशाने प्रश्न सुटेल असे काहींना वाटते.
- प्रा.उषा भरडे, स.भु.महाविद्यालय
बातम्या आणखी आहेत...