मुंबई - जैन समाजाच्या पर्युषण पर्वानिमित्त मीरा-भाईंदर आणि मुंबई महापालिकेने घातलेल्या मांस-मटन विक्री बंदीवरून शिवसेनाविरूद्ध भाजप 'सामना' रंगला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका!!' असे सामनाच्या अग्रलेखातूनधमकावले आहे. अग्रलेखात म्हटले आहे, ' याआधीही जैनांची ‘पर्युषण’ पर्वं होतच होती; पण कत्तलखाने व मांसाहारबंदीची थेरं तेव्हा कुणाच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग हे सर्व आताच हट्टाने का केले जात आहे? हीच धर्मांधता मुसलमानांच्या डोक्यात भिनली व तो हिंदू समाजाचा कायमचा शत्रू बनला. ‘पर्युषणा’च्या नावाखाली महाराष्ट्राला डिवचू नका. ‘जगा आणि जगू द्या’ याच मंत्राप्रमाणे ज्याला जे खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. उगाच अहिंसेची धार्मिक लुडबूड करू नका!'
जैन धर्मीयांचे पर्युषण 11 ते 18 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. या काळात मीरा-भाईंदर शहरात मांसविक्रीवर बंदी आणली आहे. कत्तलखाने आठ दिवस बंद ठेवण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. याला शिवसेनेचा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून मांस बदीवर सडकून टीका करण्यात आली आहे, तर जैनांना रोखठोक सल्ला देण्यात आला आहे. अग्रलेखात म्हटले आहे, 'आतापर्यंत धर्माच्या नावावर धर्मांध मुसलमानांची दादागिरी चालत असे, पण मुसलमानांप्रमाणे ‘अल्पसंख्याक’ म्हणवून घेत जैन बांधवही त्याच धर्मांध मार्गाने जाणार असतील तर देव त्यांचे रक्षण करो. कारण ९२-९३ सालात मुंबईत उसळलेल्या हिंसाचारात या गुजराती-जैन बांधवांचे रक्षण करण्याचे काम ‘हिंदू’ म्हणून मराठी बांधवांनी केले होते व
धर्मांधांच्या हिंसेस हिंसेने उत्तर दिल्यामुळेच गुजराती-जैन बांधवांचे रक्षण झाले, जीव वाचले, त्यांच्या इस्टेटी वाचल्या. त्या काळातही ‘पर्युषण’ पर्वे आलीच होती. पण त्या हिंसाचाराचे समर्थन करण्यात आमचे जैन-गुजराती बांधव आघाडीवर होते. अगदी ‘मातोश्री’वर झुंडीच्या झुंडीने येऊन
शिवसेनाप्रमुखांना भेटून, ‘‘बाळासाहेब, तुम्ही होतात, शिवसेना होती म्हणून आमचे व उद्योगधंद्यांचे रक्षण झाले,’’ अशी कबुली देणारे हेच लोक आज अहिंसेच्या गप्पा मारतात तेव्हा आश्चर्य वाटते. ' दरम्यान मीरा-भाईंदर महापालिकांनी पर्युषण पर्वात आठ दिसव मांस विक्री बंदीचा निर्णय रद्द केला आहे. आता पर्युषण पर्वाच्या पहिल्या दिवशी गुरूवारी आणि शेवटचे दोन दिवस म्हणजे 17 व 18 सप्टेंबरला मांस विक्री बंद राहील.