आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्टेशनजवळ फेरीवाला झोन स्थापन करा; सचिन तेंडुलकरचे मुंबई जिल्हाधिका-यांना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू असताना प्रसिद्ध क्रिकेटपटू, खासदार सचिन तेंडुलकर याने या समस्येवर एक उपाय सुचवला अाहे. ‘रेल्वे फलाटांचे रुंदीकरण, फुटओव्हर ब्रिजेसवर सीसीटीव्ही लावावेत, मुंबईत जलवाहतूक सुरू करावी, रेल्वेस्थानकाजवळ अधिकृत फेरीवाला झोन स्थापन करावेत,’ अशा सूचना करणारे पत्र त्याने नुकतेच मुंबईचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांना पाठवले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य व मुंबई शहरासाठी ‘व्हिजन २०२५’ प्रकल्प तयार केला आहे. त्या प्रकल्पामध्ये अजून काय काय असायला हवे याबद्दलचे आपली मते सविस्तरपणे सचिनने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात मांडली आहेत.  मुंबईतील रस्त्यांची स्थिती भयानक असून ती सुधारण्यासाठी व रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात यावी. मुंबईत वाहतुकीची कोंडी व तिच्याशी संबंधित समस्याही उग्र बनल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी मुंबई अंतर्गतच जलमार्गे प्रवासी वाहतुकीस प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही सचिनने केल्या अाहेत.  मुंबईतील उपनगरी रेल्वेस्टेशनजवळ अधिकृत फेरीवाला तसेच फूड झोन स्थापन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पादचाऱ्यांनी रस्त्याच्या मधून न चालता स्कायवॉक तसेच पदपथांचा वापर करावा यासाठी त्यांना सूचना देणेही गरजेचे असल्याचे सचिनचे म्हणणे अाहे. लोकल गाड्यांच्या उंचीपेक्षा फलाटांची उंची कमी असल्याने अनेक अपघात होतात, त्याविषयी चिंता व्यक्त करून सचिनने फलाटांची उंची वाढवण्याची गरज व्यक्त केली. अनेक फुटओव्हर ब्रिजेसवर सीसीटीव्ही बसवायला हवेत. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी हरितबेटे तयार करून या शहराचे वातावरण पर्यावरणस्नेही करावे, असेही सचिने आपल्या प्रस्तावात म्हटले अाहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
 
खासदार निधीतूनही दिले दोन कोटी रुपये   
चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली त्या एल्फिन्स्टन रेल्वेस्थानकावरच्या अरुंद पुलाचे आता लष्कराची मदत घेऊन विस्तारीकरण करण्यात येणार अाहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबईतील फुटओव्हर ब्रिजेसच्या विस्तारीकरण व दुरुस्तीच्या कामांसाठी सचिन तेंडुलकर याने अापल्या खासदार निधीतून २ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले अाहे. यासंदर्भात सचिनने अलीकडेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना एक पत्र पाठवले होते. दोन कोटी रुपयांपैकी एक कोटी पश्चिम रेल्वे व १ कोटी मध्य रेल्वेला देण्यात यावेत, अशी विनंती केल्याचेही पत्रात सचिनने म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...