आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमा आगांना श्वानांची काळजी, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उडाली भंबेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळ सरकारच्या निर्णयाविरोधात आयोजित पत्रकार परिषदेत सलमा आगा व तिची मुलगी शासा. - Divya Marathi
केरळ सरकारच्या निर्णयाविरोधात आयोजित पत्रकार परिषदेत सलमा आगा व तिची मुलगी शासा.
मुंबई- खासदार रामदास आठवले यांच्या रिपाइंला श्वानांची फारच काळजी लागल्याचे दिसून येत आहे. सध्या केरळ सरकारने काढलेल्या एका आदेशामुळे आठवले त्रस्त असून श्वान बचावासाठी त्यांनी पक्षाच्या टीव्ही-चित्रपट विभागाच्या अध्यक्षा व अभिनेत्री सलमा आगा यांना समोर आणले.

आठवले यांची सीएसटीजवळील मुंबई मराठी पत्रकार संघात आठवड्याला एकतरी पत्रकार परिषद असतेच असते. शुक्रवारी मात्र आठवलेंची जागा सलमा आगा यांनी घेतली होती. केरळ सरकारने श्वान मारण्यासासंदर्भात काढलेला आदेश कसा चुकीचा आहे? याबाबत सलमा यांनी त्रोटक माहिती दिली. त्यांच्या निवेदनानंतर प्रश्नोत्तरे सुरू झाली. पहिलाच प्रश्न. एफटीआयआय आंदोलनासंदर्भात आला आणि सलमा यांची मती गुंग झाली. कसनुसं हसून त्या म्हणाल्या, ‘ये एफटीआयआय कहाँ है? वहाँ इतने दिन आंदोलन किसके लिए हो चल रहा है?’ त्यावर पत्रकारांमध्ये प्रचंड हशा.

दुसरा प्रश्न पत्रकारांनी विचारला, ‘तुम्ही श्वान बचावाची मागणी करताय? मग तुमचे पक्षाध्यक्ष रामदास आठवले राज्यातल्या गोवंश हत्या बंदीच्या विरोधात कसे ?’ हा प्रश्नही सलमा यांच्यासाठी बाउन्सरप्रमाणे गेला. शेजारी बसलेली सलमा यांची मुलगी शासा आगा खान तिच्या मदतीला आली. आणि हे दोन्हीचे संदर्भ वेगवेगळे असल्याचे ती सांगू लागली.

‘मुंबईतल्या घोडागाड्या बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?’ या प्रश्नावरही सलमा आगाची पुन्हा तीच संभ्रमावस्था. शेवटी वैतागून एक पत्रकार म्हणाला, ‘काही बातमीसाठी तरी सांगा?’ शेजारी बसलेला पार्टीचा कार्यकर्ता सलमा यांच्या कानात कुजबुजला आणि यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे सलमा यांनी जाहीर केले.