मुंबई - नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा उखडून टाकण्याचे प्रकरण ताजे असतानाच संभाजी ब्रिगेडने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रांवर आक्षेप घेतला आहे. दादरच्या ऐतिहासिक शिवसेना भवनावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचे असलेले चित्र हटवा, नाहीतर ब्रिगेड आपल्या पद्धतीने ते चित्र काढून टाकेल, अशी धमकी संभाजी ब्रिगेड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम शिवरायांच्या नावाचा वापर करत राजकारण केले. मुस्लिम अाणि मराठ्यांमध्ये दंगली पसरवल्या. आता शिवसेना शिवरायांपेक्षा बाळासाहेबांना मोठे समजू लागली आहे. त्यामुळेच शिवसेना भवनावर छत्रपती शिवराय छोटे आणि बाळासाहेब मोठे दाखवण्यात आलेत. शिवसेनेने शिवरायांची ही केलेली बदनामीच आहे,’ असा आरोप आखरे यांनी केला. सेना भवनावरील बाळासाहेबांचे चित्र काढण्यात यावे, त्याबाबतचे िनवेदन ब्रिगेडने मुंबई पोलिस आयुक्त, मुख्यमंत्री आदींना दिले आहे. या कारवाईबाबत आम्ही काही काळ वाट पाहणार आहोत. त्यानंतरही आमच्या मागणीचा िवचार केला नाही तर ब्रिगेड पद्धतीने आम्ही बाळासाहेबांचे चित्र हटवू, असे आखरे यांनी सांगितले. यावेळी मुंबई प्रमुख अमोल जाधवराव, मुंबई निरीक्षक सुधीर भोसले, केंद्रीय निरीक्षक सुहास राणे उपस्थित हाेते.
संभाजी ब्रिगेडमध्ये फूट
‘संभाजी ब्रिगेड’ संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड १२ जानेवारी रोजी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करणार आहेत. ब्रिगेडने नुकतीच स्वत: राजकीय पक्षाची स्थापना केली असताना गायकवाड यांचे हजारो कार्यकर्त्यांसह ‘शेकाप’मध्ये दाखल होणे, ब्रिगेडमध्ये उभी फूट पडल्याचे समजण्यात येत आहे.
गायकवाड यांच्या प्रवेशाची घोषणा ‘शेकाप’ सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. त्या वेळी मराठा सेवा संघाचे शांताराम कुंजीर, ‘शेकाप’ महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, ‘शेकाप’चे मुंबई प्रमुख राजू कोरडे, उद्योजक विनोद पाटील उपस्थित होते. ‘इतके दिवस ‘शेकाप’मधून आऊटगोईंग होत होते, आता इनकमिंग सुरू झाले आहे. गायकवाड यांच्या प्रवेशाची प्रक्रिया तीन वर्षे सुरू होती. येत्या १२ जानेवारी रोजी पुण्यातील शनिवारवाड्यावर प्रवेशाचा समारंभ होणार आहे. त्यामध्ये ‘रासप’, राष्ट्रवादी, काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आदी पक्षातील गायकवाड यांना मानणारे हजारो कार्यकर्ते ‘शेकाप’मध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली.
मुंबईत मराठा मोर्चा काढू नये : गायकवाड
‘आजपर्यंत राज्यात ४४ मराठा मोर्चे काढण्यात आले. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना २० मागण्यांची निवेदने देऊन झाली. नागपुरात राज्यव्यापी मोर्चा काढण्यात आला. परत मुंबईत मोर्चा काढण्याची गरज आपल्याला वाटत नाही. त्यामुळे हा मोर्चा रद्द करण्यात यावा’, असे प्रवीण गायकवाड म्हणाले.
मराठा माेर्चाचा निर्णय समितीनेच घ्यावा : अाखरे
-मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिका, २६ जिल्हा परिषदा अाणि २९६ तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड हा पक्ष लढवणार अाहे.
-गडकरी यांचा पुतळा हटवताच मुख्यमंत्री पाळेमुळे शोधण्याची भाषा करू लागले आहेत. मात्र, जेव्हा भाकप नेते काॅ. गोविंद पानसरे यांचा खून झाला त्याची पाळेमुळे शोधावी असे मुख्यमंत्र्यांना का वाटले नाही?
- ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड शेतकरी कामगार पक्षात गेले, काही हरकत नाही. मात्र त्यांच्याबरोबर एकही कार्यकर्ता जाणार नाही.
-मराठा क्रांती मूकमोर्चाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे, मात्र मुंबईतील शेवटचा राज्यव्यापी मोर्चा काढावा की नको, त्याची तारीख काय याबाबत मोर्चाच्या संयोजन समितीने निर्णय घ्यावा, ब्रिगेडचे त्याबाबत काहीही म्हणणे नाही.