मुंबई - “राजसंन्यास’ या नाटकात राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी राजांबाबत केलेले लिखाण हे विकृतच आहे. त्यामुळे संभाजी राजांबद्दलचे गैरसमज दूर करून त्यांचा खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी शासनाने इतिहास तज्ज्ञांची एक समिती नेमावी, अशी आग्रही मागणी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केली आहे. तसेच या समितीच्या अहवालानंतर पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा बसवायचा किंवा नाही याचा निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
“संभाजी राजे हे वडिलांशी भांडून मोगलांना जाऊन मिळाले होते’ असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले होते. या वक्तव्यावर मराठा संघटनांकडून निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असलेल्या खासदार संभाजी राजे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील संभाजी उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नाही याकडे लक्ष वेधत ते म्हणाले की, गडकरींच्या पुतळ्याचा अट्टहास धरणाऱ्यांनी अगोदर संभाजी महाराजांचा पुतळा लावावा. या वादात कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा मनोदय व्यक्त करत कुणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.