आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराचा ठपका असलेले आणखी 5 अधिकारी समृद्धी प्रकल्पात, अनिल गोटे यांनी केला गौप्यस्फोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांना पारदर्शी कारभार हवा असला तरी तसा कारभार करणारे अधिकारी त्यांच्याकडे असतीलच  याची काही खात्री देता येत नाही. फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पातच भ्रष्ट कारभाराचा ठपका असलेले अधिकारी असल्याचे समोर आले आहे. भ्रष्ट कारभाराचे आरोप झाल्याने  व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले असले तरी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या आणखी काही अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांचे काय, त्यांना दूर कधी केले जाणार, असा सवाल सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.    
 
समृद्धी महामार्ग प्रकल्पावर मोपलवारांसारखे भ्रष्टाचाराचा ठपका असलेले एकच अधिकारी नाहीत, हे कागदपत्रांवरून समोर येत आहे. सहव्यवस्थापकीय संचालक असलेले किरण कुरुंदकर यांच्यावर कोलकाता येथे बंद पडलेल्या अर्नाल्ड कंपनीचे शेअर नातेवाइकांच्या नावाने खरेदी करून काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी चौकशी झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेले जगन्नाथ विरकर यांच्यावर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात असताना एसीबीकडून चौकशी झाली होती. कुरुंदकर व विरकर यांची भ्रष्टाचारप्रकरणी अजूनही चौकशी सुरू असून सरकार अंतिम निष्कर्षांपर्यंत आलेले नाही.    
 
मुख्य अभियंता असलेले उल्हास देवडवार महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सक्तीच्या रजेवर असून, त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. अधीक्षक अभियंता असलेले अनिल गायकवाड हे महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी असून तुरुंगाची हवा खाल्लेल्या या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी असलेल्या रेवती गायकर या भिवंडी येथे एसडीओ असताना भ्रष्टाचारप्रकरणी माजी आमदार विवेक पंडित यांच्या तक्रारीन्वये त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. देवडवार हे सुरुवातीला समृद्धी महामार्ग टीममध्ये होते, पण आता त्यांची नागपूरला बदली झाली आहे. तर गायकवाड समृद्धी महामार्ग टीममध्येच आहेत. कुरुंदकर व विरकर यांच्याप्रमाणे रेवती गायकर यांचीही चौकशी सुरू असून या चौकशीचा निष्कर्ष अद्याप आलेला नाही.    
 
समृद्धी महामार्ग टीममध्ये अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने आपल्याला मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याच्या थाटात त्यांचा कारभार सुरू आहे. थेट वाटाघाटींच्या हरकती, पर्यावरणविषयक सुनावण्या तसेच शेतकऱ्यांच्या सूचनांना ते केराच्या टोपल्या दाखवत आहेत, असा आरोप गोटे यांनी केला आहे.    
बातम्या आणखी आहेत...