आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक मैलाच्या दगडांचे अस्तित्व 'दफन’, इतिहासप्रेमींकडून जतनाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील परळ येथे अतिक्रमणे हटवताना ब्रिटिशकालीन ऐतिहासिक महत्त्वाचा मैलाचा दगड सापडल्याचे व तो आता नीट जतन करणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात येत असले तरी यात तथ्य आढळत नाही. मुंबईतील विविध विभागांतील अंतर दर्शविण्यासाठी ब्रिटिशकाळात जे मैलाचे दगड बसविले होते, त्यात १३ ज्ञात मैलाच्या दगडांपैकी सहा दगड महापालिकेच्याच अनास्थेचे बळी ठरले आहेत. मुंबई शहराचा इतिहास जपण्याबाबत मुंबई महापालिका किती उदासीन आहे, हेच सत्य यातून दिसते.   
 
अठराव्या शतकात मुंबईतील फोर्ट विभागात असलेल्या हॉर्निमन सर्कलजवळील सेंट थॉमस चर्च हा “शून्य मैल’ आरंभबिंदू मानून या शहरात प्रत्येक मैलावर पंचकोनी आकाराचा एक-एक दगड बसवण्यात आला. जुन्या मुंबईची सरहद्द ही माहिम व शीव या ठिकाणांपर्यंतच होती. हे मैलाचे दगड बेसाॅल्ट दगडापासून बनवलेले असून त्यात रोमन आकड्यामध्ये मैलाचे अंतर नमूद केलेले आहे. मुंबई पुरातन वारसा व जतन समितीकडे असलेल्या रेकॉर्डमध्ये शहरातील मैलाच्या १३ दगडांची नोंद असून त्यातील फक्त सहा मैलाचे दगड अजूनही तग धरून आहेत.
 
परळ येथे अतिक्रमण हटवताना नुकताच सापडलेल्या एस. एस. राव मार्गाच्या पदपथावरील मैलाच्या दगडाचाही समावेश होता. दादर पश्चिम येथील एस. के. बोले मार्गावर सुमारे तीन फूट उंचीचा मैलाचा दगड पदपथाचे काम करताना महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांनी असा गाडून टाकला आहे की तो दगड आता फक्त एक फूटच वर आहे. परळ येथे नुकताच सापडलेला मैलाचा दगडही असाच दीड फूटच वर उरलेला आहे.   
 
इतिहासप्रेमींकडून जतनाची मागणी  
मुंबईचा पहिला मैलाचा दगड आहे मेट्रोकडून काळबादेवीकडे जाताना लागणाऱ्या रस्त्यावर. तिथे एस. पी. जैन इन्स्टिट्यूटच्या दाराजवळ व एक मैल अंतर दाखविणारा हा दगड पदपथामध्ये इतका गाडला गेला आहे की पुन्हा पदपथ दुरुस्तीचे काम निघाले तर तो जमिनीमध्ये गडपच होईल. या दगडांचे पालिकेला जतन करता येत नसेल तर हे दगड बाहेर काढून ते भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात ठेवावेत, अशी मागणी मुंबईतील इतिहासप्रेमींकडून होत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...