आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांच्या घोटाळ्याची चौकशी; नवी मुंबई परिवहनच्या ठेकेदारांवर कारवाई करणार: पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाणे आणि नवी मुंबई परिवहन सेवेतील ठेकेदाराच्या दरातील तफावतप्रकरणी सखोल चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सरकारला सादर करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली.   
 
ठाणे परिवहन सेवेच्या बंद पडलेल्या बस, त्यांच्या दुरुस्तीच्या साधन खरेदीत झालेला घोटाळा, जेएनएनयूआरएम अंतर्गत जुन्या बसचे मॉडेल पुरवणे यासंदर्भात आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील, किरण पावसकर, हेमंत टकले यांनी लक्षवेधी मांडली. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत १४० मोठ्या आकाराच्या, तर ५० मध्यम आकाराच्या बसेसचा पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार २०१५ मध्ये उत्पादित ६८, तर २०१६ मध्ये उत्पादित २४ बसेस आहेत, असे पाटील यांनी या लक्षवेधीस उत्तर दिले. लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे शहरात बसची संख्या कमी आहे. तब्बल ७०० बसची आवश्यकता आहे. मात्र, सध्या फक्त २६४ बसेस कार्यान्वित आहेत, तर ३०० बसेस मुंबई आणि नवी मुंबई आणि अन्य महानगरपालिका परिवहन सेवेच्या आहेत. ठाणे परिवहन सेवा स्वयंपूर्ण असण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.  
 
कर्मचाऱ्यांची देणी त्वरित चुकवणार   
परिवहनच्या कर्मचाऱ्यांची सुमारे ३५ कोटींची थकीत देणी आहेत. ही देणी चुकवण्यासाठी लवकरच महासभेकडून निर्णय घेऊन तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. थकीत देणीमध्ये पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील फरक, महागाई भत्ता आदींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...