आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घाेटाळा: ठेकेदारासह जलसंपदाच्या पाच अधिकाऱ्यांवरही गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- काेकणातील बाळगंगा धरण प्रकल्पानंतर आता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील काळू नदीवर धरण बांधण्यात गैरप्रकार केल्याप्रकरणी कंत्राटदार निसार खत्री आणि जलसंपदा विभागाच्या पाच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरण बांधण्याच्या प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेत बनावट कागदपत्रे बनवून सरकारची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर अाराेप अाहे. ठाण्याच्या कोपरी पोलिस ठाण्यात राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे याप्रकरणी तक्रार करण्यात आली हाेती.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या काळू नदीवर धरण बांधण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतल्यानंतर २००९ मध्ये यासाठीची निविदा प्रक्रिया पार पडली. यामध्ये चार कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या निविदा प्रक्रियेद्वारे या धरणाचे काम खत्री यांच्या एफ. ए. एंटरप्रायजेस या कंपनीला मिळाले होते. मात्र, या निविदा प्रक्रियेची ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने चौकशी केली असता ही निविदा प्रक्रियाच बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते. प्रत्यक्षात कंत्राटदार खत्री यानेच इतर कंपन्यांच्या नावे बनावट निविदा दाखल केल्या होत्या. तसेच या बोगस कंपन्यांच्या नावाने बँक गॅरंटी आणि इसारा रकमेचे डिमांड ड्राफ्टही देण्यात आले होते. त्याशिवाय ही सगळी प्रक्रिया बनावट असल्याचे संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष करून शासनाचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत जलसंपदा विभागाच्या पाच अधिकाऱ्यांनाही या गुन्ह्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक गिरीश बाबर, तत्कालीन मुख्य अभियंता बाबासाहेब पाटील, तत्कालीन अधीक्षक अभियंता सतीश वडगावे, तत्कालीन कार्यकारी अभियंता जयवंत कासार आणि तापी महामंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता हरिदास टोणपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या निविदेची अंदाजित किंमत चुकीच्या पद्धतीने ठेकेदार कंपनीचा फायदा करून देण्याचे आरोपही या पाचही अधिकाऱ्यांवर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याअगोदर बाळगंगा धरण प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत घोटाळा केल्याप्रकरणी खत्री आणि त्याच्या कुटुंबीयांसह अकरा शासकीय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होऊन सर्वांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे विशेष न्यायालयाने खत्रीला जामीन मंजूर केला होता.
बातम्या आणखी आहेत...