आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : शास्त्रीनंतर आता सहायक प्रशिक्षकांच्या निवडीवरून वाद?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक निवडीचा वाद संपून नव्या अध्यायाला सुरुवात होते आहे, असे वाटत असतानाच रवी शास्त्रीला बी. अरुणकुमार गोलंदाजी प्रशिक्षक पाहिजे होते व बांगर फलंदाजीचा प्रशिक्षक पाहिजे होता, अशा बातम्या प्रसिद्ध व्हायला लागल्या आहेत. प्रशिक्षकांच्या निवडीबाबत बुधवारी समाधान व्यक्त करणाऱ्या प्रशासक मंडळालाही या वादात गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गोलंदाजीचे प्रशिक्षक जहीर खान आणि परदेशात संघ असताना फलंदाजीचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या निवडीवर प्रशासक नाराज असल्याच्या वावड्या उठवण्यात आल्या आहेत.  
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद रवी शास्त्री यांच्या समर्थकांनीच निर्माण केला आहे. रवी शास्त्री गोलंदाजीच्या प्रशिक्षणाबाबत फारसे नाव नसलेल्या बी. अरुण यांनाच अधिक पसंती देतात, हे सर्वश्रुत आहे. कारण यापूर्वीही रवी शास्त्री यांनी आपल्याला प्रशिक्षकपदी नेमायचे असल्यास अरुण, बांगर व श्रीधर हाच संच हवा, असे म्हटले होते.  
 
आताही रवी शास्त्री यांनी बी. अरुण यांना गोलंदाजीचे प्रशिक्षक कायम ठेवावे, असे म्हटल्याचे कळते. जहीर खान याने गोलंदाजीच्या प्रशिक्षणाचा ‘रोड मॅप’ तयार करावा. त्याची अंमलबजावणी बी. अरुण यांच्याकडून करून घ्यावी, असे शास्त्री यांना वाटते. राहुल द्रविड यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंसोबतही प्रत्यक्ष काम करायला शास्त्री यांना आवडेल का? याबाबतही शंका आहे.  
 
मात्र, शास्त्री यांना पटत नसलेल्या गोष्टी प्रशासकांच्या नावे पसरवण्याचे काही हितशत्रूंचे प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे. अशीही चर्चा सुरू आहे, की, क्रिकेट विकास समितीला मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे काम देण्यात आले होते. तरीही त्यांनी गोलंदाजी व फलंदाजीचा प्रशिक्षक निवडण्याचा अागंतुकपणा का केला?  
 
म्हणजे कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतरचे नाट्य हे त्याच्या जागी रवी शास्त्री यांची निवड होऊनही संपलेले नाही. कर्णधाराला व ज्येष्ठ खेळाडूंना जसा स्वत:ला सोईस्कर असा प्रशिक्षक हवा आहे; तसेच प्रशिक्षकालाही सोईस्कर असे सहायक प्रशिक्षक हवे आहेत. आता याप्रकरणी बीसीसीआय आणि प्रशासकिय समिती कार्य निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...