आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला तुरुंग अधीक्षकाचे नेत्यांना पत्र... कैदीच नाही महिला कर्मचारीही वरिष्ठांच्या होतात शिकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - राज्यातील मध्यवर्ती कारागृहात फक्त महिला कैदीच नव्हे, तर अनेक महिला कर्मचारी आणि अधिकारीही आपल्या वरिष्ठांच्या लैंगिक छळाला बळी पडत असल्याचा खळबळजनक आरोप एका महिला तुरुंग अधीक्षकाने केला आहे. शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना एका महिला तुरंग अधीक्षकाने पत्राद्वारे वरिष्ठांच्या लैंगिक छळाची कहाणीच कथन केली आहे. मात्र, हे पत्र आपले नसल्याचा खुलासा जरी संबंधित महिला अधीक्षकाने केला असला तरीही त्यातील आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली आहे.    
 
महिला कैदी मंजुळा शेट्ये मारहाण आणि हत्या प्रकरणानंतर मध्यवर्ती कारागृहातील लैंगिक छळाचे एक नवे प्रकरण समोर आले आहे. मध्यवर्ती कारागृहे ही कशा प्रकारे लैंगिक छळ छावण्या बनल्या आहेत याचा पर्दाफाश करणारे एक पत्र शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांना प्राप्त झाले आहे.  यामध्ये एका कारागृह उपमहानिरीक्षकाद्वारे होत असलेल्या लैंगिक छळाची तक्रार करण्यात आली आहे. आपल्या पदाचा आणि राजकीय संबंधांचा गैरवापर करत या अधिकाऱ्याने राज्यातील विविध कारागृहांतील तब्बल ६० ते ७० महिला तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे या अधिकाऱ्याच्या छळवणुकीला बळी पडलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीला हा प्रकार कळल्यानंतर त्याने शासकीय निवासस्थानीच आत्महत्या केल्याची धक्कादायक बाबही या पत्रात नमूद करण्यात आली आहे.    
 
याबाबत गोऱ्हे म्हणाल्या, हे पत्र प्राप्त होताच संबंधित महिला अधिकाऱ्याशी आपण संवाद साधला. त्या वेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने हे पत्र आपले नसल्याचा खुलासा आपल्याजवळ केला आहे. कदाचित एखाद्या पीडित महिला कर्मचाऱ्यानेच आपले नाव समोर येऊ नये यासाठी दुसऱ्या महिला अधिकाऱ्याच्या नावाने हे पत्र लिहिले असावे, अशी शक्यता आहे.  
 
पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार  
 
पत्रातील आरोप पाहता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज लक्षात घेऊन मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचेही गोऱ्हे यांनी सांगितले. आपल्याला तीन दिवसांपूर्वी हे पत्र प्राप्त झाले असून सुरुवातीला आम्ही या पत्राची शहानिशा केली. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही करत आहोत. तसेच विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात तसेच संसदेच्या अधिवेशनात आमचे लोकप्रतिनिधी हे प्रकरण लावून धरतील, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...