मुंबई- अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुरुवारीही जोरदार खरेदी केली. या खरेदीमुळे सेन्सेक्स ८४.९७ अंकांनी वाढून २८२६६.६१ या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक १७.८५ अंकांनी वधारून ८७३४.२५ वर स्थिरावला. वाहन, भांडवली वस्तू आणि पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची भरभरून खरेदी झाली.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर शेअर बाजारात जोरदार खरेदीला सुरुवात झाली,ती दुसऱ्या सत्रातही कायम दिसली. अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. बुधवारच्या तेजीनंतर गुरुवारी सकाळच्या सत्रात जोरदार नफा वसुली झाली. त्यामुळे दोन्ही निर्देशांक
मर्यादित कक्षेत राहिले. त्यानंतर देशातील गुंतवणूकदार संस्था आणि छोट्या गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवल्याने बाजारात तेजी आली. अर्थसंकल्पात किफायतशीर घरांना पायाभूत उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आल्याने त्या क्षेत्रातील समभागांना मागणी आली. कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवरही गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र वातावरण होते, युरोपातील बाजारांतही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.
माहिती तंत्रज्ञान समभागाची खरेदी : अमेरिकेतील एच वन -बी व्हिसा प्रकरणानंतर घसरणीला लागलेले माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना गुरुवारी झालेल्या खरेदीने चांगला आधार दिला. अमेरिका फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याने तसेच जागतिक सकारात्मक संकेताने आयटी समभागांची खरेदी वाढल्याचे तज्ज्ञांनी या वेळी सांगितले.
चमकलेले समभाग
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्राचे समभाग २.८५ टक्क्यांनी वाढले. डॉ. रेड्डीज लॅबच्या समभागांनी ३.३१ टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर मान मिळवला. तर हीरो मोटोकॉर्प, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्सच्या समभागांना जानेवारीतील विक्री घटल्याचा फटका बसला. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १५ समभाग तेजीत राहिले. पुढील काळात तेजीचे वातावरण राहणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
स्मॉल कॅप-मिड कॅपला मागणी
मागील वर्षभर गुंतवणूकदारांची पसंती ठरलेल्या स्मॉल कॅप व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांना पुन्हा मागणी आली आहे. गुरुवारी स्मॉल व मिड कॅप निर्देशांक ०.९५ टक्क्यांनी वधारले. ग्राहकाेपयोगी टिकाऊ वस्तू समभाग निर्देशांक सर्वाधिक २.१८ टक्क्यांनी वधारला. आरोग्य निर्देशांक १.७९ टक्के, माहिती तंत्रज्ञान १.७८ टक्के आणि तंत्रज्ञान क्षेत्रीय निर्देशांक १.६८ टक्क्यांनी वधारले.