आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाम्हाला चिंता शेतकऱ्यांची, मात्र हिंमत असेल तर मध्यावधी घ्याच - उद्धव ठाकरें

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भाजपने आम्हाला मध्यावधी निवडणुकीची धमकी देऊ नये. आम्हाला त्याची पर्वा नाही. शेतकरी आयुष्य मध्यावर सोडत आहेत त्याची आम्हाला जास्त चिंता आहे. हिंमत असेल तर मध्यावधी घ्या. माझा  शिवसैनिक वणव्यासारखा पेटून उठेल. सदासर्वदा आपणच जिंकत राहू, अशा भ्रमात फडणवीसांनी राहू नये. तुम्ही आमच्या पाठीत वार केला, तर छाताडावर बसून पलटवार केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साेमवारी भाजपला दिला.
   
शिवसेनेच्या  ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंग्याच्या षण्मुखानंद हाॅलमध्ये अायाेजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव यांनी भाजपला खडे बाेल सुनावले.  
 
वीस मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपल्या मित्रपक्षावर निशाणा साधला. ‘निवडणुकांमध्ये यश मिळत आहे म्हणून भाजपने मस्तीत राहू नये. मस्ती उतरण्यासाठी एक निवडणूक पुरेशी आहे. मध्यावधी निवडणूक घेतल्यास आपल्यालाच यश मिळेल, या भ्रमात राहून सत्तेतील मित्रपक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हीही तयार आहोत. तुमच्यात हिंमत असेल तर मध्यावधी घ्याच. होऊन जाऊन दे,’ असे उद्धव म्हणाले.    

सत्तेची आम्ही पर्वा करत नाही. मुंबई जिंकण्यासाठीही भाजपने आकाशपाताळ एक केले होते.  पैसा, सत्तेचा वापर करून शिवसेनेला संपवण्याची भाषा केली. पण माझ्या शिवसैनिकांनी जिवाचे रान करून भाजपला पराभूत केले. त्यामुळे भाजपला अजूनही निवडणुकीची खुमखुमी असेल तर त्यांनी ती दाखवावीच. आम्ही तयार आहाेत. सध्या आम्हाला मध्यावधीपेक्षा आयुष्य मध्यावर सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांची अधिक चिंता वाटते, असे उद्धव यांनी सांगितले.    
शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे. त्याला कर्जमुक्ती देताना वेड्यावाकड्या अटी टाकणार असाल तर अटींचा कागद फाडून फेऊन देऊ. शिवसेना शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभी असून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत नाही ताेपर्यंत शिवसेना फडणवीस सरकारला सोडणार नाही. याचा अर्थ आम्ही सत्ता साेडणार असे होत नाही. यासाठी तर अनेक लोक टपून बसले आहेत. मात्र त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले.    
 
५१ वर्षे होत असताना शिवसेनेने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले. १९९२ च्या दंगलीत ज्यांना वाचवले त्यांनीही पाठीवर वार केले. पण रक्तबंबाळ होऊनसुद्धा रक्तदान करते, त्याचे नाव शिवसेना आहे. आमच्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अभेद्य कवच असल्याने आम्ही कोणत्याही संकटाला घाबरत नाही. मर्दाची छाती असल्याने आम्ही आव्हाने देतो. त्यामुळे भाजपने आम्हाला संकटाचे इशारे देण्याच्या भानगडीत पडू  नये, असे उद्धव यांनी सुनावले. 
प्रादेशिक पक्षांची या देशाला आता गरज उरलेली नाही, अशी हवा भाजप करत आहे. पण शिवसेना त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. मात्र, शिवसेनेचा जन्म मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी झाला असून त्यांच्यासाठी अाम्ही जिवाचे रान करत राहू.  मराठी माणसांच्या मागे उभा राहिलेला  हा एकमेव पक्ष आहे. कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रात मराठी माणसांवर अत्याचार होत असताना नरेंद्र व देवेंद्र हे दोघेही गप्प बसले आहेत. ते देशाचा विचार करत असतील तर शिवसेना फक्त मराठी माणसांचा विचार करेल. १९६९ मध्ये ज्याप्रमाणे शिवसेना सीमाप्रश्नावरून भडकली होती तसे मोठे आंदोलन उभे करून सरकारला सळो की पळो करून सोडेल, हे लक्षात ठेवा, असा आणखी एक इशारा उद्धव यांनी दिला.
 
पुढील स्लाइडवर वाचा, उद्धव ठाकरेही पाठिंबा देतील : रामदास आठवले...
बातम्या आणखी आहेत...