आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीची एक दिवस रजा द्यावी, शिवसेना नगरसेविकेने दिले मुंबई मनपाला पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई - महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीत प्रचंड त्रास होतो. याचा कामावरही परिणाम होत असल्याने महिलांना मासिक पाळीची एक दिवसाची रजा देण्यात यावी. याबाबतचा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत मांडण्यात यावा, असे पत्र शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापालिकेला दिले आहे.   
 
म्हात्रे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले, मासिक पाळी ही स्त्रियांमधील नैसर्गिक शारीरिक क्रिया असली तरी त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन योग्य नाही.  त्यामुळे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास स्त्रिया वर्षानुवर्षे मुकाटपणे सहन करतात. अनेक देशांमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी सुटी दिली जाते. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेतही महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचा ठराव महासभेत मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. महापालिकेत हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी जाईल, अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.   
 
मुंबईतील कल्चर मशीन या कंपनीने त्यांच्या ७५ महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा मंजूर केलेली आहे. अशी रजा देणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेनेही एक दिवसाची रजा द्यावी, अशी मागणी होत आहे.    
 
या देशांत मिळते सुटी   
इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, तैवान आणि इटालीमध्ये स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात तीन दिवसांची भरपगारी पीरियड लिव्ह देण्यात येते. दक्षिण कोरियामध्ये ज्या महिला अशी रजा घेणार नाहीत त्यांना अतिरिक्त वेतन दिले जाते. ऑक्टोबर महिन्यात ब्रिटनस्थित ‘कोएक्झिस्ट’ या कंपनीने मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्याचे जाहीर केले. अशी सुटी देणारी ती ब्रिटनमधली पहिली ठरली कंपनी आहे.
बातम्या आणखी आहेत...