आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी निवडणुकांची; पक्षाचे काम प्रामाणिकपणे न केल्यास शिवसेना देणार नारळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार केला; परंतु त्यात शिवसेनेला स्थान न दिल्याने शिवसेना नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर नेते आणि संपर्कप्रमुखांची बैठक बोलावल्याने भाजपबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु या बैठकीत असे काहीही न होता फक्त पक्षबांधणीवरच दोन तास मॅरेथॉन चर्चा झाली. भाजपपेक्षा ताकद वाढवण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली. त्याबरोबरच काम न करणाऱ्यांना नारळ देण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बैठकीस उपस्थित सूत्रांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  
 
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री येथे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कुणालाही संधी न मिळाल्याने शिवसेना नाराज होती आणि खासदार संजय राऊत यांनीही याबाबतची नाराजी जाहीररीत्या व्यक्तही केली होती. त्यामुळे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. 

या बैठकीला शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेत्यांसह खासदार संजय राऊत, पर्यावरणमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर आदी वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.  
 
मात्र, या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, भाजपशी युती याबाबत कसलीही चर्चा झाली नसल्याची माहिती देऊन सूत्रांनी सांगितले, बैठकीच्या अजेंड्यावर हे विषयच नव्हते. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुका, त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. राज्यात भाजप आपली ताकद वाढवत आहे. पुढील निवडणुकीतही जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळे आपणही पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला पाहिजे, यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आपसातील वाद संपवून पक्षवाढीवर भर देण्याचे आदेश नेत्यांना दिले. पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी काम करावे आणि काम न करणाऱ्यास नारळ दिला जाईल, तर पक्षवाढीसाठी काम करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी देण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले. तसेच पक्ष मजबूत करण्यासाठी विभागीय मेळावे घेण्यासोबतच शिवसेनेच्या सर्व नेत्यांची आणि जिल्हा संपर्कप्रमुखांची आता दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.   
 
ग्रामपंचायत निवडणुकीबाबत चर्चा  : संजय राऊत  
या बैठकीत फक्त ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आणि संघटनात्मक बांधणीवरच चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने नाराजी व्यक्त करणाऱ्या शिवसेनेच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपबाबत चर्चा झाली नसावी, यावर राजकीय वर्तुळात कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. याबाबत शिवसेनेच्या नेत्याशी बोलणे केले असता त्यांनी सांगितले, कोणाला कशावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बैठकीत आम्ही या विषयावर चर्चा न करता पक्षबांधणीवरच चर्चा केली हेच खरे.
बातम्या आणखी आहेत...