आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नको; जुळवून घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्याला विरोध असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. युती सरकार असताना लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या. याला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता. मात्र, प्रमोद महाजन यांच्यामुळे बाळासाहेब तयार झाले. त्या वेळी केंद्रात सत्ता आली. मात्र, राज्यातील सत्ता गेली होती. त्यामुळे एकत्र निवडणुका न घेता एका तरी सरकारला पाच वर्षे पूर्ण करू द्यावे, असा उद्धव ठाकरे यांचा विचार आहे.  

सत्तेत राहून जनतेची कामे चांगल्या प्रकारे करता येतात. विरोधात राहून जेवढी कामे झाली त्यापेक्षा जास्त कामे सत्तेत राहून झालेली आहेत. सत्तेत असलो तरी जनतेसाठीच विरोध करत आहोत. त्यामुळे सत्ता न सोडताच कार्यकाळ पूर्ण करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. त्यामुळेच ते सरकारमधून बाहेर पडण्याबाबत वक्तव्य करत नसल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही औरंगाबाद येथे भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेशी पंगा न घेण्याचे निर्देश दिल्याचे समजते. भाजप-शिवसेना दोघेही एकमेकांना सांभाळून घेत असल्याने हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल यात शंका नाही.   

शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे कामे होत नसल्याची तक्रार केली होती. त्या वेळी काही आमदारांची कामे होत नसल्याने मंत्र्यांविरुद्ध अशा तक्रारी होतातच, असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे समजते. नाराज आमदारांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असून सध्या तरी शिवसेनेच्या मंत्र्यांना डच्चू देण्याचा विचार नसल्याचेही शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनतेच्या समस्यांवर शिवसेनेने सत्तेत असूनही आवाज उठवला असल्याने जनमानसात शिवसेनेची प्रतिमा चांगली होऊ लागली आहे, असे उद्धव ठाकरे यांना वाटते. राज्यभरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी म्हणून शिवसेनेनेच पहिल्यांदा आंदोलन केले, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यामुळेच दहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देेण्यास सरकारला भाग पडले. एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीनंतर रेल्वे पुलावरील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी शिवसेनेनेच केली. स्वतः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली आणि त्यानंतरच फेरीवाले हटले.
 
सरकार पाच वर्षे पूर्ण करेल :
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, असे म्हटले जात होते. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे याची घोषणा करतील, असे सांगितले जात होते. परंतु तसे काही झाले नाही. सत्तेतून बाहेर न पडताच सत्ता उपभोगतच जनतेची कामे चांगल्या प्रकारे केली जाऊ शकतात, असा उद्धव ठाकरे यांना विश्वास आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षांचा कालावधी नक्की पूर्ण करील, यात शंका नाही.   
बातम्या आणखी आहेत...