आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेत स्वबळाची खुमखुमी; फटक्याची धास्तीही,नेत्यांचा दबाव: उद्धव ठाकरेंना हवी युती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असतानाच मुंबई महापालिका निवडणुकीत आपलीच ताकद जास्त असल्याचे दाखवण्यासाठी भाजप-शिवसेनेने सर्वेक्षणाचे निष्कर्ष जारी करून १००-१०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. भाजप-शिवसेनेचे नेते स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा आग्रह सोडायला अद्याप तयार नाहीत. नेते- कार्यकर्त्यांच्या स्वबळाच्या खुमखुमीला विभक्त लढलो तर मोठा फटका बसण्याच्या धास्तीने वेसण घातली आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही युतीसाठी अनुकूल असल्याचे अजूनही सांगितले जात आहे.

युतीत ‘मोठा भाऊ’ कोण, यावरून युतीचे गुऱ्हाळ लांबत चालल्याचे चित्र असतानाच राज्य व केंद्राच्या सत्तेत असलेल्या या दोन ‘राजकीय भावंडां’नी मुंबईत स्वत:ची ताकद अजमावण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जारी करून एकमेकांना तुल्यबळ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मुंबई महानगरपालिकेचा बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना आणि भाजपने मुंबईत स्वतंत्र सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात मुंबई भाजपला १०० च्या आसपास जागा मिळण्याचा दावा केला होता. आता शिवसेनेनेही आपल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली असून शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा त्यात केला आहे. दोघांनाही प्रत्येकी १०० जागा मिळणार असतील तर अन्य सर्व पक्षांना फक्त २७ जागाच मिळणार हे यातून दिसून येत आहे. मात्र या दोघांच्या सर्व्हेत खरा सर्व्हे कोणाचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार स्वबळावर लढल्यास १०० च्या वर जागा मिळून शिवसेना नंबर एकवर राहील. भाजपासोबत युती करून निवडणुक लढवल्यास ९० च्या आसपासच जागा मिळतील. त्यामुळे युती केल्यास जास्त जागा मिळून पहिला क्रमांक मिळाला तरी स्वबळावर लढल्यास जास्त जागा जिंकता येणार असल्याने स्वबळावरच सत्ता प्राप्त करून भाजपला पाठीमागे फरफटत आणता येईल असे मत शिवसेना नेत्यांचे आहे.
 
दोघांच्या सर्व्हेत खरा सर्व्हे कोणाचा अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेने मुंबईत केलेल्या सर्वेक्षणानुसार शिवसेना स्वबळावर लढल्यास १०० च्या वर जागा मिळून शिवसेना नंबर एकवर राहील. भाजपासोबत युती करून निवडणुक लढवल्यास ९० च्या आसपासच जागा मिळतील. त्यामुळे युती केल्यास जास्त जागा मिळून पहिला क्रमांक मिळाला तरी स्वबळावर लढल्यास जास्त जागा जिंकता येणार असल्याने स्वबळावरच सत्ता प्राप्त करून भाजपला पाठीमागे फरफटत आणता येईल असे मत शिवसेना नेत्यांचे आहे.
 
नेत्यांचा दबाव, फुटीची भीती तरीही उद्धव ठाकरेंना हवी युती 
सर्वेक्षणानुसार  शिवसेनेला स्वबळावर १०० पेक्षा जास्त जागा मिळणार असल्या तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युतीच्या बाजूने आहेत. उद्धव यांना मुंबईत युती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत. नेत्यांनी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीही उद्धव युतीचाच निर्णय घेतील. युती केल्यास नाराज शिवसैनिक पक्ष सोडतील अशी भीतीही व्यक्त होत आहे. परंतु उद्धव यांना पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकांवर विश्वास असल्याने बाहेर जाणाऱ्यांना ते किंमत देणार नाहीत, अशी माहितीही शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
 
नुकसान टाळून युती व्हावी, असा मुख्यमंत्र्यांचाही प्रयत्न 
दुसरीकडे भाजपनेही केलेल्या सर्वेक्षणात १०० च्या वर जागा मिळतील असे दिसून आले आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या विचारात आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही युतीच्याच बाजूने आहेत. पक्षाध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान  मोदी यांनी त्यांना युतीचे सर्वाधिकार दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, युती करण्याबाबत मला सर्वाधिकार दिले असले तरी सर्व नेत्यांशी चर्चा करूनच मी निर्णय घेणार आहे. युती न केल्यास दोन्ही पक्षांना फुटीमुळे नुकसान होईल. त्यामुळे हे नुकसान टाळून युती व्हावी असा माझा प्रयत्न आहे.
 
प्रत्येकी १००-१०० जागांचा दावा ही दोघांचीही ताकद दाखवण्याची खेळी 
- दोन्ही पक्षांना १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आदी अन्य पक्षांना फक्त २७ जागाच मिळतील हे शक्य आहे का, असे शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याला विचारले असता त्याने सांगितले, सर्वेक्षणात ज्या गोष्टी दिसतात त्या खऱ्याच असतात असे नाही. परंतु अनेकदा सर्व्हे खरे ठरतात. त्यानुसार योजना आखता येते. नंतरच खरे काय ते स्पष्ट होईल.
 
- राजकीय वर्तुळात मात्र भाजप व शिवसेनेच्या स्वबळावरील १००-१०० जागांच्या दाव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. खरे सर्वेक्षण कोणाचे, असाही प्रश्न विचारला जात असून केवळ स्वतःची ताकद दाखवण्यासाठीच हे अहवाल जारी झाल्याचे म्हटले जात आहे.
 
फडणवीस हाच भाजपचा मुख्य चेहरा
अागामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपचा मुख्य चेहरा असतील ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! महापौरपदापासून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत प्रवास करणाऱ्या फडणवीस यांनी नगर परिषदांच्या निवडणुकीतही महाराष्ट्र पिंजून काढला होता आणि भाजप सरकारची दोन वर्षांतील राज्याची प्रगती लाेकांसमोर मांडली होती. फडणवीसांवर विश्वास ठेवून लोकांनी नगर परिषदांमध्ये भाजपच्या पदरात भरभरून दान टाकत पक्षाला एक नंबरचे स्थान दिले. हे स्थान टिकवण्यासाठी फडणवीसच पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने लोकांसमोर जाणार आहेत.