आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना- भाजप युतीचे केवळ हाकारे; शक्यता कमीच, फडणवीस- उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रोफाइल फोटो - Divya Marathi
प्रोफाइल फोटो
मुंबई - एकमेकांवर टीकेची झाेडत उठवत अागामी निवडणुका स्वबळावरच लढण्यासाठी शिवसेना- भाजपच्या बहुसंख्य नेत्यांनी दंड थाेपटलेले असतानाच या दाेन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  मात्र  युतीसाठी एकमेकांना साद घालत असल्याचे दिसते. दाेन्ही पक्षांच्या या भूमिकेमागे राजकीय खेळी असल्याची शक्यता वर्तवली जात अाहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच अखेरच्या क्षणापर्यंत आपापल्या कार्यकर्त्यांना संभ्रमात ठेवून हे दोन्ही पक्ष महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढण्याची शक्यता अधिक आहे. मुंबईसह राज्यभरात जनाधार गमावलेल्या मनसेनेही युतीची तयारी दाखवली असली तरी भाजप-शिवसेना उघडपणे तरी त्यांच्यासाेबत जाण्याची शक्यता दिसत नाही.  

मुंबई महापालिकेत सत्ता राखणे हे शिवसेनेच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे, तर भाजपकडून ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरू अाहेत. मुख्यमंत्र्यांच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, तर शिवसेनेकडून पक्षप्रमुखांना युती करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली असली तरी प्रत्यक्ष युतीच्या वाटाघाटी करताना मात्र जागा वाटपावरून दमछाक होणार आहे. युती झाली तरी १०० टक्के जागांवर होणार नाही, असे स्पष्ट संकेत मुनगंटीवार यांनी दिले आहेतच. ‘विधानसभा-लोकसभेत १०० टक्के जागांवर युती शक्य असते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ७०-८० टक्क्यांपर्यंत युती होऊ शकते,’  हे मुनगंटीवारांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाणारे आहे. युतीची चर्चा  सुरू होण्यापूर्वीच युतीचे प्रमाण ७०- ८० टक्के असेल तर प्रत्यक्ष जागा वाटप करताना काय होईल? याची कल्पना करता येऊ शकते.   

दोन्ही पक्षांतील अनेक नेत्यांचा युतीस विरोध आहे. स्वबळावर विधानसभा लढलोत तर महापालिका का  नाही? असा प्रश्नही विचारला जात आहे. विशेष म्हणजे मुंबई मनपा क्षेत्रात काँग्रेस असो की राष्ट्रवादी यांची शिवसेना- भाजपला रोखण्याची ताकद नाही. त्यामुळे स्वत:च्या ताकदीचा अंदाज घेण्याासाठी यापेक्षा अधिक उत्तम संधी भाजपसमोर नसेल.   

चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात  : ‘स्वपक्षाचे बळ वाढविण्याचे काम माझे होते, ती जबाबदारी मी पार पाडली.  अाता युती करायची की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावयाचा आहे,’  असे सांगत मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी  निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला. शिवसेनेतही स्वबळावर लढण्याचा आग्रह आहे. मात्र, केवळ युती करणे टाळल्याचे खापर आपल्यावर फुटू नये, एवढीच िचंता पक्षाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही उत्सुकता दाखवली जाते.
 
मनसेसोबत छुपी युती?  
शिवसेनेशी युती न झाल्यास स्वबळावर लढणारी भाजप मनसेसोबत छुपी युती करण्याची रणनीती अवलंबू शकते. एकमेकांच्या तगड्या उमेदवारांविरुद्ध  कमजोर उमेदवार देऊन हे दोन्ही पक्ष आतून एकमेकाला मदत करू शकतात.