आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून शिवसेना मंत्र्यांचे वॉकआऊट! यवतमाळ पालकमंत्रिपदावरून संजय राठोड यांना हटवल्याने पेटला वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई- आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस आता मंत्रालयापर्यंत पोहाेचली आहे. पालकमंत्र्यांच्या फेरनियुक्त्या करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी चक्क मंत्रिमंडळ बैठकीतून वॉकआऊट केले. तसेच या बैठकीत कोणतीही पूर्वकल्पना न देता आयत्या वेळी मुख्यमंत्र्यांनी बुलेट ट्रेनचा प्रस्ताव चर्चेसाठी आणल्याबद्दलही शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

गेल्या आठवड्यात राज्यातील पालकमंत्र्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात आल्या. या फेरनियुक्तीत अडीच वर्षे यवतमाळचे पालकमंत्रिपद भूषवलेले शिवसेनेचे संजय राठोड यांचे पालकमंत्रिपद काढून भाजपच्या मदन येरावार यांच्याकडे देण्यात आले. तर राठोड यांची वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय शिवसेनेच्या रावते यांच्याकडून परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काढून त्यांना नव्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पालकमंत्री बदलण्याचा हा निर्णय परस्पर घेतला गेल्याने तो शिवसेनेला चांगलाच झोंबला आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलेन - उद्धव :  दरम्यान, राज्यमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. अडीच वर्षांत यवतमाळचे पालकमंत्री म्हणून आपले काम चांगले असतानाही हटवल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र या विषयावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

दोन जिल्ह्यांवरून वाद : परभणी व यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेच्या पालकमंत्र्यांचे काम चांगले असतानाही फेरनियुक्त्यांमध्ये त्यांची या जिल्ह्यांची जबाबदारी काढून घेतल्याने शिवसेनेत नाराजी होती. या नाराजीला मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी वाट करून दिली.

देसाईंनी मांडला मुद्दा, वर निषेधही नोंदवला
पालकमंत्र्यांच्या फेरनियुक्त्या करताना शिवसेनेला विश्वासात न घेतल्याचा मुद्दा बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मांडला. मित्रपक्षाला विश्वासात न घेता निर्णय घेणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी आपला निषेध नोंदवला. तसेच मंत्रिमंडळ बैठकीतून ते बाहेर पडले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे रामदास कदम, दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे हे इतर मंत्रीही बैठक सोडून बाहेर पडले.
बातम्या आणखी आहेत...